पुणे - प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने हडपसर, खराडी, वडगाव खुर्द या तीन ठिकाणी ६ हजार २६४ सदनिका बांधण्यास व लाभार्थींबरोबर करार करण्यास सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली. पालिकेच्या जागेवर बांधण्यात येणारी ही घरे सर्वसामान्य पुणेकरांना स्वस्त दरात उपलब्ध व्हावीत व यावर लावणारा जीएसटी रद्द करण्याची मागणी करीत सर्व विरोधकांनी प्रस्तावाला विरोध केला; परंतु भाजपाने बुहमतांवर प्रस्ताव मंजूर करून घेतला. स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.शासन निर्णयानुसार राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ३८२ शहरांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जमिनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून त्यावरील झोपडपट्ट्या आहे तिथे पुनर्विकास करणे, कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या व अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, खासगी भागीदारीद्वारे परवडणाºया घरांची निर्मिती करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान देणे आदी पद्धतीने सदनिका बांधणार आहेत.हडपसर परिसरात ३१७०, खराडीत २०१३, वडगाव खुर्दमध्ये १०७१ अशी ६२६४ सदनिका बांधणार आहेत. एकूण जमिनीचे क्षेत्र ९९ हजार २२४ चौरस मीटर इतके आहे. प्रकल्पाची एकूण किंमत ६४८ कोटी ७२ लाख रुपये इतकी आहे. केंद्र शासनाचे अनुदान ९३ कोटी ९६ लाख असून, राज्य शासनाचा अनुदानाचा वाटा ६२ कोटी ६४ लाख रुपये आहे. लाभार्थ्यांकडून ४९२ कोटी १२ लाख रुपये इतकी रक्कम घेण्यात येणार आहे. हडपसरमधील सर्व्हे नंबर ७६ सोडून अन्य जमिनी टीडीआरपोटी पुणे मनपाच्या ताब्यात आल्या आहेत.