पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 13:13 IST2022-11-18T13:11:28+5:302022-11-18T13:13:33+5:30
विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीने केली आत्महत्या
नारायणगाव (पुणे) : पत्नीच्या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना धोंडकरवाडी (ता. जुन्नर) येथे घडली. रमेश कानसकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या संदर्भात घडलेला प्रकार असा, तीन दिवसांपूर्वी वारुळवाडी येथे रस्त्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात रमेश यांची पत्नी विद्या यांचा मृत्यू झाला होता. या अपघाती मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने रमेश यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना धोंडकरवाडी (ता. जुन्नर) येथे घडली. आठ महिन्यांपूर्वी प्रेम विवाह करून सुखी संसाराची स्वप्ने पाहात असलेले कानसकर कुटुंब या प्रकाराने पुरते उद्ध्वस्त झाले आहे.
धोंडकरवाडी येथील रमेश कानसकर यांचा ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेत जमिनीचे सपाटीकरण करण्याचा व्यवसाय होता. आठ महिन्यांपूर्वी विद्या जाधव (वय २२) हिच्याबरोबर त्याचा प्रेम विवाह झाला होता. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी रमेश कानसकर हे धोंडकरवाडी येथून दुचाकीवरून पत्नी व सासू यांना घेऊन नारायणगाव येथे खरेदीसाठी आले होते. पुन्हा घरी जात असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे समोरून ऊस घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का दुचाकीला बसला. यामुळे विद्या खाली पडून तिच्या डोक्यावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीच्या अपघाती मृत्युमुळे रमेश कानसकर हे मानसिक तणावाखाली होते. मागील तीन दिवसापासून त्यांनी अन्न व पाण्याचा त्याग केला होता. अखेर आज पहाटे त्यांनी राहत्या घरात विषारी औषध घेतले. अत्यवस्थ अवस्थेत त्यांना जुन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. खराब रस्ते, ट्रॅक्टरला दोन ट्रॉल्या जोडून सुरू असलेली नियमबाह्य ऊस, वाहतूक तसेच अन्य वाहतूक धोकादायक अपघातांना निमंत्रण देत आहे.