ठाकरेंनी म्हणावं, ‘रात गई बात गई’; आम्ही त्यांना बरोबर घेऊ- चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 12:48 IST2023-04-08T12:47:40+5:302023-04-08T12:48:52+5:30
भाजपचा नेता आहे तसाच मी एक महाराष्ट्रीयन माणूसही आहे...

ठाकरेंनी म्हणावं, ‘रात गई बात गई’; आम्ही त्यांना बरोबर घेऊ- चंद्रकांत पाटील
पुणे : ‘उद्धव ठाकरेंनी म्हणावे ‘रात गई बात गई’ आम्ही त्यांना बरोबर घेऊ. देवेंद्र फडणवीस किती मोठ्या मनाचे आहेत ते मला माहिती आहे. ते दरवाजे बंद करणारे नाहीत,’ असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. ठाकरे यांनी विचार करावा, शरद पवार त्यांच्या पक्षाची माती करतील, असेही ते म्हणाले.
पुण्यात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे यांनी पुन्हा भाजपबरोबर येण्याचे काही संकेत दिले आहेत का, असा प्रश्न विचारला असता, पाटील यांनी वरील विधान केले. ठाकरे यांनी गेली ३३ महिने त्यांचे दरवाजे बंद ठेवले आहेत. घरी या एकत्र बसू असे एकदाही म्हटलेले नाही, असेही पाटील म्हणाले.
भाजपचा नेता आहे तसाच मी एक महाराष्ट्रीयन माणूसही आहे. घडलेल्या घटनांची मलाही खंत आहे. त्यामुळेच मी हिंदुत्वासाठी उद्धव ठाकरेंनी भाजपबरोबर यावे, असे आवाहन केले. माझ्या पक्षात तसे स्वातंत्र्य आहे. शरद पवार यांच्या मागे गेल्याने अनेक नेत्यांची माती झाली. तसेच ते पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंचीही माती करतील, असे म्हणत पाटील यांनी पवारांना लक्ष्य केले.
राजकारणात लवचिकता महत्त्वाची असते. ताठपणामुळे स्वत:चाही फायदा होत नाही व पक्षाचा, समाजाचाही नाही. त्यामुळे आता ठाकरे यांनीच मी त्या-त्या वेळी बोललो, त्यात मनापासून काहीही नव्हते. असे झाले तर त्यांचा विचार होईल. आता ते काहीही बोलले तर आम्ही अजिबात सहन करणार नाही, असा गर्भित इशाराही पाटील यांनी दिला.