पुणे : भरधाव वेगात असलेल्या कॅबने धडक दिल्याने दुचाकीवर ट्रिपल सीट चाललेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.१३ जुलै ) रात्री डेक्कन येथील झाशी राणी चौकात घडली. यामध्ये कॅब चालकही जखमी झाला आहे. रोहित कुमार (वय २०, रा.वाकड) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कॅब चालक जमीर वलीसाब शेख (वय २९, रा. येरवडा ) याच्याविरुध्द डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिंटू संतोषसिंग कुमार (वय १८, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. जमीर हा त्याची कॅब घेऊन रात्री साडेबाराच्या सुमारास भरधाव वेगाने झाशी राणी चौकातून चालला होता. यावेळी ट्रिपल सीट जाणा-या फिर्यादीच्या दुचाकीला कॅबने धडक दिली. या अपघातात दुचाकी चालवणारा रोहित कुमार जागेवर ठार झाला तर फिर्यादी कुमार व किशोर मन्यम हे दोघे जखमी झाले. मृत व जखमी हे तिघेही एका हॉटेलमध्ये काम करतात. हॉटेलमधील काम संपवून ते ट्रिपल सीट घरी निघाले होते. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वाय. बी. शिंदे तपास करत आहेत .
भरधाव कॅबच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 18:47 IST
भरधाव वेगात असलेल्या कॅबने धडक दिल्याने दुचाकीवर ट्रिपल सीट चाललेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला.
भरधाव कॅबच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
ठळक मुद्देमृत व जखमी हे तिघेही एका हॉटेलमध्ये काम करतात