Two arrested from Pune on suspicion of having links with IS, one women | ISIS संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन महिलेसह दोघांना पुण्यातून अटक

ISIS संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन महिलेसह दोघांना पुण्यातून अटक

पुणे : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने (एनआयए) पुण्यातून एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.सादिया अन्वर शेख (वय २१, रा़ येरवडा) आणि नबील सिद्दिकी खत्री (वय २७, रा़ कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत. दहशतवाद्यांशी संपर्कात असल्याच्या संशयावरुन सादिया हिला आतापर्यंत तिसर्‍यादा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एनआयए आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकांनी दिल्लीतील जामिया नगर परिसरातून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरुन मार्च महिन्यात एका डॉक्टर दांपत्याला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत नबील खत्री आणि सादिया शेख यांचे नाव पुढे आले. त्यानंतर एनआयएने या दोघांवर नजर ठेवली होती. ते पुण्यात स्लिपर सेल म्हणून काम करत असल्याचे त्यांच्या तपासात दिसून आल्यावर दिल्लीतून एनआयएचे पथक थेट पुण्यात येऊन धडकले. त्यांनी राज्य दहशतवाद विरोधी पथक व स्थानिक पोलिसांच्या मदतीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळस येथे कारवाई करुन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही महत्वाची कागदपत्रे तपास यंत्रणांच्या हाती लागली आहेत.

नबील खत्री हा कोंढव्यात जीम ट्रेनर म्हणून काम करतो. सादिया शेख याला ती अल्पवयीन असल्यापासून इसिसच्या संपर्कात असल्याचा संशय आहे.
सादिया शेखचा इतिहास संशयास्पद या प्रकरणात आता एनआयएने अटक केलेल्या सादिया शेख हिचा आजवरचा इतिहास नेहमीच संशयास्पद राहिला आहे. याबाबत पुणे एटीएसचे तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले की, गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपण २०१५ मध्ये सादिया शेख हिच्यावर नजर ठेवली होती. त्यात ती इसिसच्या संपर्कात असल्याचे इंटरनेटवरील पडताळणीवरुन लक्षात आले होते. त्यानंतर तिचे आपण अनेक दिवस समुपदेशन केले. त्यासाठी त्यांच्या समुदायातील मौलवींची मोठी मदत झाली होती. यावेळी तिच्या वागणूकीत व पेहरावामध्येही बदल झाल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले होते. त्यानंतर तिच्या आईसमोर तिने आपण आता त्यांच्याशी संपर्कात राहणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर एटीएसमधून आपली बदली झाल्यानंतर पुढे २०१८ मध्ये तिला काश्मीरमध्ये पकडण्यात आले होते. त्याचा तपास एनआयए करीत असल्याने त्याची माहिती आम्हाला मिळू शकली नाही.

२०१८ मधील काश्मीर प्रकरणात पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार यांच्या पुढाकाराने साहिया व तिच्या आईने पत्रकार परिषद घेतली होती.
याशिवाय अंजुम इनामदार यांनी सांगितले की, त्यांनी आमच्याशी संपर्क साधला होता. या मुलीवर पोलिसांची सतत पाळत होती. तिच्या कॉलेजमध्ये जाऊनही पोलीस चौकशी करीत असतात. त्यामुळे पुण्याला आपण वैतागलो असल्याचे तिने व तिच्या आईने सांगितले होते. त्यासाठी शिक्षणासाठी तिला काश्मीरला पाठविण्यात आले होते, असा खुलासा त्यावेळी तिने केला होता. या प्रकरणानंतर गेल्या २ वर्षात आपला तिचा अथवा तिच्या आईशी काहीही संपर्क झालेला नाही. यापूर्वी देशातील सर्व तपास यंत्रणांनी तिच्याकडे चौकशी केली आहे. पण, तिच्यावर आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. एनआयएने तिच्यावर कारवाई केल्याची माहिती मिळाली. पण, सध्या आपला तिच्याशी संपर्क नसल्याचे इनामदार यांनी सांगितले. २०१८ मध्ये पुण्यातील एक तरुणी काश्मीरमध्ये मानवी सुसाईट बॉम्बर म्हणून आल्याची खबर गुप्तचर विभागाने दिली होती. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर ही खबर आल्याने संपूर्ण काश्मीरमध्ये अलर्ट देण्यात आला होता. हे वाचून आपण स्वत: जम्मू अँड काश्मीर पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी आपल्याकडे चौकशी केल्यानंतर सोडून दिल्याचे सादिया शेख हिने त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला असताना आता २ वर्षानंतर पुन्हा एका प्रकरणात तिचे नाव पुढे आले आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Two arrested from Pune on suspicion of having links with IS, one women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.