राहुल गांधींनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यात तथ्य; न्यायालयात अहवाल सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 09:17 IST2024-05-28T09:13:33+5:302024-05-28T09:17:47+5:30
सात्यकी यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे....

राहुल गांधींनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यात तथ्य; न्यायालयात अहवाल सादर
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. सात्यकी यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी त्यांच्याविरोधात पुणेन्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले होते. या आदेशाची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती.
अखेर पोलिसांनी तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. राहुल यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे. आता या पोलिसांच्या अहवालाच्या आधारे न्यायालय येत्या गुरुवारपर्यंत ‘सीआरपीसी’च्या कलम २०४ नुसार कार्यवाही सुरू करणार आहे, असे सात्यकी यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले.