केडगाव :महाराष्ट्र शासनाने ३१ जुलैपूर्वी रखडलेली एमपीएससी अधिकाऱ्यांची भरती केल्यास ती खऱ्या अर्थाने माझा मुलगा स्वप्निलला श्रद्धांजली ठरेल, अशी भावनिक प्रतिक्रिया स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांनी व्यक्त केली.
शासनाने मदत जाहीर केली असली, तरी माझा स्वप्निल परत येणार नाही. शासनाचे पैसे किती दिवस पुरणार आहे? पैसे घ्यायचे की नाही ते नंतर ठरवू. अद्याप याबाबत निर्णय घेतला नाही. विद्यार्थ्यांनो, एमपीएससीमध्ये जास्त गुरफटून जाऊ नका. इतर मुलांना मदत करा. माझ्या मुलामध्ये मी तुकाराम मुंडे, विश्वास नागरे पाटील आदी अधिकारी पाहत होतो. तो जरी गेला तरी भविष्यामध्ये परीक्षेतून अनेक तुकाराम मुंढे व विश्वास नांगरे पाटील या महाराष्ट्रामध्ये तयार होतील, हीच खरी माझ्या मुलाला श्रद्धांजली ठरेल अशी भावना लोणकर यांनी व्यक्त केली.
सुधीर मुनगंटीवार यांनी एमपीएससीसाठी मुलांना दोन वर्षे वाढवून मिळावे ही केलेली मागणी राज्य शासनाने व अधिकारी वर्गाने जर मान्य केली असती, तर आज माझा स्वप्निल गेला नसता. वाढत्या वयामुळे स्वप्निलने टोकाचे पाऊल उचलले असे मत लोणकर यांनी व्यक्त केले.
केडगाव तालुका दौंड येथे स्व. स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबीयांची अमित राजसाहेब ठाकरे यांनी भेट घेतली. या वेळी अमित ठाकरे म्हणाले की, स्वप्निलचे बलिदान मोठे आहे. भविष्यात जर एमपीएससीच्या मुलांना न्याय मिळाला तर तो फक्त स्वप्निलच्या त्यागामुळे असेल. या लढाईत लोणकर कुटुंब एकटं नसून संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या सोबत आहे. शासनाच्या जवळपास लाखभर जागा रिक्त असताना शासन जागा भरत नाही. मग मुलं अशा टोकाला पोहोचेपर्यंत सरकार झोपलं आहे का? असा सवाल अमित ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे.
यावेळी सागर पाटसकर, सचिन कुलथे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दोन लाखांची मदत
स्वप्निलच्या कुटुंबाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने दोन लाख रुपयांचा धनादेश अमित राज ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. मदतीचा धनादेश स्वप्निलचे वडील सुनील लोणकर यांनी स्वीकारला.
केडगाव तालुका, दौंड येथील स्वप्निलच्या आईवडिलांचे सांत्वन करताना अमित राज ठाकरे.