पुणे : आठवड्यात दोन ते तीन अशा संख्येने सातत्याने सुरू असलेल्या बड्या नेत्यांच्या दौऱ्याने पुणेकर त्रस्त झाले आहेत. कोणत्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री हवेत, उपमुख्यमंत्री हवेत (तेही दोन दोन) या स्थानिक पुढाऱ्यांच्या आग्रहामुळे त्यांची राजकीय हौस भागते आहे, त्याचे मोल मात्र सर्वसामान्य पुणेकरांना चुकवावे लागत आहे. सलग तीन-चार दिवसांच्या संततधार पावसामुळे पुणेकर आधीच वैतागले आहेत. त्यात या नेत्यांच्या दौऱ्यांमुळे त्यांना लेटमार्क चुकवण्यासाठी कार्यालयात घाईने जाताना किंवा तिथून घरी येताना कधी वाहनकोंडी, कधी रस्ताच बंद, त्यात पोलिसांची अरेरावी असा त्रास सहन करावा लागतो आहे. नागरिकांबरोबरच आता पोलिस, प्रशासकीय अधिकारी या सातत्याने होत असलेल्या दौऱ्यांमुळे वैतागले आहेत.
एकाच नेत्याचे किमान तीन कार्यक्रम
नेता आला की, त्यांच्या उपस्थितीत किमान तीन जाहीर कार्यक्रम घेतले जातात. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे असेच तीन-तीन कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या वेळी होते. त्यामुळे दुपारपासूनच शहरात वाहनकोंडी होती. वाहतूक नियंत्रणाकरिता असलेले पोलिस वाहूतक सुरळीत ठेवण्यासाठी नाही तर नेत्यांची वाहने जाईपर्यंत ती थांबवून ठेवण्यासाठी झटत होते. दिवसभर या नेत्यांची वाहने, त्यांच्या पुढेमागे पोलिसांची वाहने, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या, कार्यक्रमाचे संयोजक, आयोजक, नियोजक असलेले स्थानिक पुढारी व त्यांच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या असा भलामोठा ताफाच बुधवारी दिवसभर शहराच्या वेगवेगळ्या भागांत फिरत होता व नागरिकांचे रस्त्यावरचे मुक्त फिरणे अवघड करत होता.
बुधवारी सायंकाळचा प्रकार
राज्यातील नेत्यांबरोबरच केंद्रीय मंत्र्यांचेही दौरे होत आहेत. यातील बहुसंख्य नेत्यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. या व्यवस्थेचाही त्रास नागरिकांना होत आहे. बुधवारी सायंकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होते. या तीनपदरी पुलाची केवळ एकच बाजू खुली होणार होती. मात्र, तरीही सायंकाळी पाच वाजल्यापासून या पुलाकडे येणाऱ्या औंध, पाषाण, चतु:शृंगी व शिवाजीनगर अशा चारही बाजूंच्या रस्त्यांवर तासाभराची वाहनकोंडी निर्माण झाली होती. कार्यालयातून घरी जायला निघालेले दुचाकीवरील महिला, पुरुष या विनाकारण निर्माण झालेल्या अडथळ्याला शब्दश: गालीप्रदान करत होते. चारचाकीमधील लोकही आपल्या गाडीची खिडकी खुली करून काय हा वैताग अशा चेहऱ्याने बाहेर पाहत होते.
असा होतो त्रास
नेते जाणार असलेल्या रस्त्यावर ५० ते १०० मीटरवर पोलिस तैनात केले जातात. त्या रस्त्यावर असलेल्या सर्व चौकांमधील वाहतूक थांबवली जाते. परिणामी संपूर्ण रस्त्यावर भलीमोठी वाहनकोंडी तयार होते. घाईमध्ये असलेल्या कोणी त्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला पोलिसांच्या अरेरावीला सामोरे जावे लागते. पोलिस कोणाचेही काही ऐकूनच घेण्याच्या मनस्थितीतच नसतात. रस्त्यावरच्या सर्व पथविक्रेत्यांना जबरदस्तीने तिथून हलवले जाते किंवा नेत्यांची वाहने जाईपर्यंतच्या वेळात व्यवसाय बंद ठेवायला भाग पाडले जाते. एखाद्याने फारच वाद घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला सरळ अडकवून ठेवले जाते.
प्रशासकीय अधिकारीही त्रस्त
मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री असे दौरे असले की, विभागीय आयुक्तांपासून ते जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, तसेच अन्य महत्त्वाच्या सरकारी आस्थापनांचे सर्व प्रमुख यांना त्या दौऱ्यात उपस्थित राहावेच लागते. त्यातही विकासकामांच्या लोकार्पणाचे कार्यक्रम असेल तर तिथे त्यांना हजेरी लावावीच लागते. नेत्यांच्या आसपासच उपस्थित राहावे लागते. अजित पवार यांच्यासारखे नेते कामामधील एखादी त्रुटी किंवा चूक काढून चारचौघांत विचारणा करतात, ते आपल्याच कनिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सहन करावेच लागते. दौऱ्यांची संख्या वाढू लागल्याने असे वरिष्ठ अधिकारीही आता त्रस्त झाले आहेत. कार्यालयीन कामकाज बाजूला ठेवून त्यांना दौऱ्यासाठी वेळ काढावाच लागतो. गैरजहेरी असली तर हितसंबंधी अधिकारी ती लगेचच नेत्याच्या लक्षात आणून देतो किंवा स्थानिक कार्यकर्तेच तसे सांगतात. ती विचारणा टाळणेच हिताचे असल्याने बहुसंख्य वरिष्ठ अधिकारी दौऱ्यांमध्ये उपस्थित राहणेच पसंत करतात.
पोलिस दलातही नाराजी
बंदोबस्त हा नेत्यांसाठी आता प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. त्यामुळेच साध्या मंत्र्यांनाही आता पोलिसांचा फौजफाटा नजरेस दिसेल असाच लागतो. त्यातही केंद्रीय मंत्री असतील तर त्यांची स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था, त्यांचे पोलिस, त्याशिवाय स्थानिक पोलिस अधिकारी व त्यांचे सहायक असा मोठा बंदोबस्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना लावावाच लागतो. लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची संख्या अतिशय तोकडी आहे, तरीही निम्म्यापेक्षा जास्त पोलिस सध्या दर आठवड्याला अशा बंदोबस्ताच्या कामातच गुंतलेले असतात.
मागील काही महिन्यांत झालेले दौरे
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-महिन्यातून किमान तीन ते चार वेळाउपमुख्यमंत्री अजित पवार- नागरिकांना त्रास नको म्हणून भल्यापहाटे कार्यक्रम घेतात; पण तरीही बंदोबस्त असतोच
बंद करा जाहीर कार्यक्रम
नोकरीची मर्यादा असल्याने नाव घेऊन बोलायला कोणीही तयार होत नाही, नागरिक संघटित नसल्याने तेही एकत्रितपणे यावर काही व्यक्त होत नाही, विरोधी राजकीय पक्ष बोलतात; मात्र त्यांच्या टीकेला राजकीय अर्थ जास्त असतो व नागरिकांचा कैवार कमी; मात्र या बहुतेकांच्या बोलण्याचे सार एकच आहे व ते म्हणजे नेत्यांनी, त्यातही महत्त्वाच्या पदांवरील नेत्यांनी त्यांचे सातत्याने होत असलेले शहरांतील दौरे बंद करावेत. महिन्यातून एखादा दुसरा कार्यक्रम व तोही विनाबंदोबस्ताचा करावा; मात्र जाहीर कार्यक्रम टाळावेत किंवा मग कसल्याही फौजफाट्याशिवाय साध्या पाहुण्याप्रमाणे यावे व जावे असेच दौरेग्रस्त नागरिकांचे मत आहे.