चंदननगर - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील प्रचंड वाहतूककोंडीमुळे अनेक नामांकित कंपन्यांनी आपला व्यवसाय परराज्यांत हलवला आहे. बंगळुरू, हैद्राबादसारख्या शहरांनी याचा थेट फायदा घेतला. याच समस्येची प्रत्यक्ष पाहणी करताना अजित पवार यांनी स्थानिक सरपंच व नागरिकांकडून ही माहिती घेतली. मात्र तशीच गरज आता नगर रस्त्यावर सुध्दा आहे. त्यामुळे अजित पवारांनी येथेसुद्दा अशीच भेट द्यावी अशी चर्चा या परिसरातील नागरिकांत होत आहे.हिंजवडीनंतर त्यांनी चाकण औद्योगिक परिसरालाही अजित पवारांनी भेट देऊन तेथील कंपन्यांना भेडसावणाऱ्या वाहतूककोंडीचा आढावा घेतला. स्थानिक उद्योजकांच्या अडचणी ऐकून त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासनही दिले; परंतु हा प्रश्न केवळ हिंजवडी-चाकणपुरता मर्यादित नाही. पुण्यातील खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा या परिसरातही मोठ्या प्रमाणावर आयटी पार्क आणि कंपन्या कार्यरत आहेत. येथे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना सकाळ-संध्याकाळ येरवडा ते वाघोलीदरम्यानच्या वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नगररोड परिसराचीही पाहणी करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. कोंडी बीआरटी काढल्यामुळे सुटली, यू-टर्नमुळे नाही!स्थानिक नागरिकांच्या मते, नगररोडवरील कोंडी बीआरटी मार्ग काढल्यामुळे कमी झाली आहे. वाहतूक विभागाचा यू-टर्न प्रयोग कोंडी कमी करण्याऐवजी नागरिकांच्या गैरसोयी वाढवणारा ठरला आहे. अनेकांना रोज अतिरिक्त येळ आणि इंधन खर्च करावा लागतो. त्यात पादचारी, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हा प्रकार अधिक धोकादायक ठरत आहे.
...तर मग नगररोडचीही पाहणी करावीअजितदादांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. हिंजवडी आणि चाकणप्रमाणेच अजित पवार यांनी नगररोड, विशेषतः येरवडा ते वाघोलीदरम्यानची वाहतूक परिस्थिती प्रत्यक्ष पाहावी, अशी मागणी होत आहे. यू-टर्नच्या ठिकाणी अपघातांचे प्रमाण, पादचाऱ्यांची असुरक्षितता आणि प्रवासाचा वाढलेला वेळ हे मुद्दे तातडीने हाताळले गेले नाहीत, तर या परिसरातील व्यापारी, आयटी कंपन्या आणि रहिवासी यांचा संयम सुटू शकतो. नागरिकांना आशा आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी जसा उद्योग आणि सामान्य माणसाचा प्रश्न ऐकून तो सोडवण्याचा प्रयत्न केला, तसाच ठोस निर्णय नगररोडच्या संदर्भात घेतील.
नगररोडवरील 'यू-टर्न प्रयोग' - नागरिक त्रस्त !नगररोडवरील वाहतूककोंडी कमी करण्याच्या उद्देशाने वाहतूक विभागाने काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणावर 'यू-टर्न' प्रयोग सुरू केला. या प्रयोगाअंतर्गत अनेक नैसर्गिक चौक कायमस्वरूपी बंद करून त्याऐवजी दूरवर कृत्रिम यू-टर्न तयार करण्यात आले. मुख्य बदलांमध्ये - कल्याणीनगरला जाणारा रस्ता बंद करून पुढे आगाखान पॅलेससमोर यू-टर्न. रामवाडी विकफिल्ड झोपडपट्टीसमोर यू-टर्न. रामवाडी पाणीपुरवठा केंद्रासमोरील वडगावशेरी गावाचा चौक बंद. आग्निबाजसमोर यू-टर्न. विमाननगर चौक बंद करून पुढे आगानगर येथे यू-टर्न. टाटा गार्डरूम चौक बंद करून चंदननगर येथे यू-टर्न. चंदननगर भुयारी मार्गालगतचा चौक बंद करून थेट २.२ किमी अंतरावर खराडी जुना जकात नाका येथे यू-टर्न.
असुरक्षितता आणि गैरसोयीचा कळस..या सर्व यू-टर्न ठिकाणी काही मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. झेब्रा क्रॉसिंग नाहीत - पादचारी रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जातात. वेगमर्यादा नाहीत - यू-टर्नजवळून वाहने भरधाव वेगाने जातात. दिशादर्शक फलकांचा अभाव - कुठला यू-टर्न कुठे नेतो याची स्पष्ट माहिती नसल्याने गोंधळ होतो. पादचारी मार्ग नाहीत - रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित जागाच उपलब्ध नाही. सर्वांत लांब यू-टर्न म्हणजे खुळेवाडी, श्रीराम सोसायटी, पाराशर सोसायटी, श्रीपार्क परिसरातील २.२ किमीचा फेरा. उर्वरित यू-टर्न सरासरी १ किमी अंतरावर आहेत. यामुळे सुमारे ३० हजार नागरिकांना हेलपाटा बसतो.
मी मांडलेल्या संकल्पनेत चौकांत ग्रेडसेपरेटर व उड्डाणपूल यातून सिग्नल फ्री करणे होता. अशा बिनभरोशाच्या यू-टर्नने नाही. मुळात नगररोडवरील वाहतूककोंडी ही चुकीच्या पद्धतीने बीआरटी मार्ग केल्याने वाहतूककोंडी होत होती. मुळात नगररोडवरील वाहतुक कोंडी ही चुकीच्या पद्धतीने बीआरटी मार्ग केल्याने होत होती. बीआरटी काढल्यामुळे पन्नास टक्के वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला आहे. यू-टर्नने कोंडी सुटली नाही. - सुनील टिंगरे, माजी आमदार शहराध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर