पुणे : शिवाजी रस्त्यावरील भिडेवाडा स्मारकाच्या बांधकामासाठी शिवाजी रस्त्यावरील बुधवार चौकातील वाहतूक रात्रीच्या वेळेत (रात्री दहा ते सकाळी सहा) पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना जंगली महाराज रस्ता-टिळक रस्त्यामार्गे स्वारगेटकडे जावे लागणार आहे.
फरासखाना वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वाहतूक बदलासाठी २ ऑगस्टपासून मंजुरी देण्यात आली. मात्र, अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे वाहतूक सुरू आहे. काम सुरू होताच, वाहतुकीतील बदल करण्यात येणार आहे. हा बदल २५ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. स. गो. बर्वे चौकातून स्वारगेटकडे जाण्यासाठी जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्यामार्गे स्वारगेटला जावे. महापालिकेकडे जाऊ इच्छिणाऱ्यांनी जंगली महाराज रस्त्याने झाशीची राणी चौकातून डावीकडे जावे. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, बिजली शॉपपासून उजवीकडे वळून श्रीकृष्ण टॉकीज- सिटी पोस्ट-लक्ष्मी रस्त्यामार्गे जावे लागते. नागरिकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.