पुणे: अंगारकी चतुर्थीनिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (दि. १२) बदल करण्यात आले आहेत. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अंगारकी चतुर्थीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. शहर, तसेच जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या भागातील भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून बाजीराव रोडमार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी टिळक रोड, अलका चित्रपटगृह, डेक्कन जिमखानामार्गे जावे. छत्रपती शिवाजी महाराज रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे) जंगली महाराज रोड, झाशीची राणी चौक, खंडुजीबाबा चौक, टिळक रोडने इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) जाणारा रोड वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.