गंधर्व गायकीची परंपरा जोपासावी : संजय देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:34+5:302021-02-05T05:18:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गुरू चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडून मिळालेला गंधर्व गायकीचा अमूूल्य ठेवा त्यांच्या शिष्यांनी जास्तीत जास्त कलाकारांंपर्यंत ...

गंधर्व गायकीची परंपरा जोपासावी : संजय देशपांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गुरू चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडून मिळालेला गंधर्व गायकीचा अमूूल्य ठेवा त्यांच्या शिष्यांनी जास्तीत जास्त कलाकारांंपर्यंत पोहोचवावा, गंधर्व गायकीची परंपरा जोपासावी, अशी अपेक्षा चंद्रशेखर देशपांडे यांचे बंधू ज्येष्ठ ऑर्गनवादक संजय देशपांडे यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ ऑर्गनवादक चंद्रशेखर हरिभाऊ देशपांडे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी देशपांडे कुटुंबीय व शिष्यांकडून रविवारी (दि. ३१) श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या वेळी प्रसिद्ध युवा गायक आनंद भाटे, संगीत रंगभूमीवरील गायिका व अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर अशा अनेक कलावंतांनी त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे तसेच देशपांडे कुटुंबीयातील संजय देशपांडे, वसंत देशपांडे, अनिल देशपांडे, विष्णू देशपांडे उपस्थित होते.
संजय देशपांडे म्हणाले, आमचे वडील सुप्रसिद्ध ऑर्गनवादक व बालगंधर्व यांचे साथीदार हरिभाऊ देशपांडे यांच्याकडून आम्हा भावडांना सांगीतिक वारसा मिळाला. चंद्रशेखर यांनी जे ज्ञान मिळविले होते ते त्यांनी शिष्यांना मुक्तहस्ते दिले. ज्ञानदान करताना काही हातचे राखून ठेवले नाही. मानसन्मान मिळावे अशी अपेक्षाही त्यांनी कधी केली नाही. त्यांचा सांगीतिक वारसा जास्तीत जास्त कलाकारांपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्याकडून मिळेलेले ज्ञान त्यांच्या शिष्यांनी पुढील पिढीला द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आनंद भाटे यांनी चंद्रशेखर देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सर्व वयोगटांतील विद्यार्थ्यांना शिकविण्याची सरांची हातोटी होती. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना ते तितक्याच तन्मयतेने शिकवत असत. मी आनंद गंधर्व झालो याचे पूर्ण श्रेय देशपांडे सरांना देतो, अशी कृतार्थ भावना त्यांनी व्यक्त केली. अस्मिता चिंचाळकर यांनी देशपांडे यांच्या शिकविण्याची वैशिष्ट्ये उलगडून दाखविली. प्रत्येक रागातील पलटे-हरकत घोटून तयार करून घेतले याचे महत्त्व आज समजते आहे. सरांची शिकवण ही आमच्या ज्ञानाचा गाभा आहे. असे त्या म्हणाल्या.
माधुरी सहस्रबुद्धे, मंजिरी आलेगावकर, अभय जबडे, विद्यानंद देशपांडे, डॉ. प्रीती गोखले, अभिजित जायदे, आशा करवंदे आदींनी भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक डॉ. अनिल पानसे यांनी केले.
--
चौकट
हरिभाऊ आणि चंद्रशेखर देशपांडे या पितापुत्राच्या नावाचा नीलफलक लावावा
देशपांडे यांच्या निवासस्थानी हरिभाऊ देशपांडे आणि चंद्रशेखर देशपांडे या पितापुत्राच्या नावाचा नीलफलक लावावा व तेथील रस्त्याला हरिभाऊ देशपांडे यांचे नाव द्यावे, अशी विनंती आशा करवंदे यांनी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्याकडे केली.