आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र असलेल्या आळंदीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी शिक्षण घेण्यासाठी हजोरो विद्यार्थी आळंदीत अनेक खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत. पण मागील काही वर्षांपासून वारकरी साधकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार होताना दिसत आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाची परिणामी तिर्थक्षेत्र आळंदीची बदनामी होत आहे. यापार्श्वभूमीवर समस्त आळंदीकर ग्रामस्थांनी एकत्र येऊन अशा खासगी वारकरी शिक्षण संस्था कायमस्वरुपी बंद कराव्यात अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदणाद्वारे केली आहे. तसेच या मागणीसाठी स्थानिक नागरिकांनी बुधवारी (दि. ८) रात्री आळंदी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते. संबंधित मागणी पूर्ण न झाल्यास आळंदी बंदचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. आळंदीत राज्यातून मोठ्या प्रमाणात मुले-मुली शालेय शिक्षण समवेत वारकरी संप्रदाय शिक्षण घेण्यासाठी येत असतात. आळंदीत दीडशेहून अधिक वारकरी शिक्षण संस्था असून काहीच संस्था फक्त धर्मदाय कार्यालयात नोंदणी केलेल्या असतात. मात्र अनेक संस्था अनाधिकृत असून त्यांच्या प्रशासकीय अंकुश नसल्याने अनेक दुर्दैवी घटना समोर येत आहेत. वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली अनेक गैरप्रकार होत असुन वारकरी साधकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढत चालले आहेत अशा अनाधिकृत खासगी वारकरी शिक्षण संस्था कायमस्वरुपी बंद कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. आजपर्यंत आळंदीतील लैंगिक शोषण प्रकार घडलेल्या खाजगी वारकरी शिक्षण संस्था संबंधित महाराजांनी ज्याच्या त्याच्या गावाला जाऊन संस्था सुरु कराव्यात. तसेच तेथेच वारकरी शिक्षणाचे धडे द्यावेत असे आळंदी बचाव, संस्था हटाव समितीमधील सदस्यांनी सांगितले.
आळंदीत वारकरी साधकांवर लैंगिक अत्याचार; स्थानिक एकवटले, पोलीस ठाण्यासमोरच मांडला ठिय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:52 IST