Toll recovery on Pune - Satara Road to vehicles who carrying help for under flood people | मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून पुणे - सातारा रोडवर टोल वसुली

मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून पुणे - सातारा रोडवर टोल वसुली

ठळक मुद्दे टोल वसुली तातडीने स्थगित करण्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

पुणे : कोल्हापूर, सांगली येथील महापूरा अडलेल्यांसाठी मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांकडून खेड शिवापूर आणि आणेवाडी येथील टोल नाक्यांवर टोल वसुली केली जात असून त्यामुळे संताप व्यक्त होत आहे़. हे दोन्ही टोलनाके राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे येत असून त्यांचे पत्र आल्याशिवाय टोल वसुली थांबविण्यास तेथील टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे़. अनेक वाहनचालकांकडील पैसे संपले असल्याने त्यांच्याकडे टोल भरण्यासाठी पैसे शिल्लक नाहीत, ते टोलवरील कर्मचाऱ्यांच्या हातापाया पडून सोडण्याची विनंती करीत आहेत़ . तरीही त्यांच्याकडून जबरदस्तीने टोल वसुल केला जात आहे़. याबाबत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी ही टोल वसुली तातडीने स्थगित करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे़.
गेली अनेक दिवस बंद असलेला महामार्ग आता सुरु झाल्याने जागोजागी थांबून राहिलेली वाहने आता कोल्हापूरच्या दिशेने निघाली आहेत़. खेड शिवापूर आणि आणेवाडी येथील टोल नाक्यांवर त्यांच्याकडून टोल वसुली केली जात आहे़. विवेक वेलणकर आणि संजय शिरोडकर यांनी नितीन गडकरी यांना पत्र पाठविले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे ते कोल्हापूर दरम्यान हजारो वाहने अनेक दिवस अडकून पडली आहेत.  पुराचे पाणी ओसरल्यानंतर या रस्त्यावर आता वाहतूक हळूहळू सुरू होईल.  

सातारा ते कोल्हापूर या रस्त्यावर किणी आणि तासवडे या दोन ठिकाणी टोल नाके असून ते महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात आहेत. आमच्या मागणीनंतर या दोन्ही टोल नाक्यावर टोल वसुली १५ दिवस स्थगित करण्याची घोषणा राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र पुणे ते सातारा या रस्त्यावर खेड शिवापुर आणि आणेवाडी या दोन ठिकाणी टोल नाके असून ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत आहे. या रस्त्यावरची वाहतूकस्थिती पूर्णपणे व्यवस्थित होईपर्यंत या दोन्ही टोलनाक्यांवरील टोलवसुली स्थगित करण्याची आवश्यकता आहे,  अन्यथा अस्मानी संकटामुळे गांजलेल्या वाहनचालकांना हा टोलचा भुर्दंड पडेल.आपणास विनंती की आपण तातडीने आदेश काढून किमान १५ दिवसांसाठी ही टोलवसुली स्थगित करून जनतेला दिलासा द्यावा.  

नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीच्या निर्णयानंतर तीन आठवडे टोलवसुली थांबवली गेली होती हे आम्ही आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. राज्यभरातून सांगली, कोल्हापूरला मदती घेऊन जाणारी वाहने या दोन टोलनाक्यांवरुन जाणार आहे़. महापूरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी गोळा झालेली मदत पोहचविण्यासाठी अनेकांनी आपली वाहने विना मोबदला उपलब्ध करुन दिली आहेत़. त्यांना या टोलचा भुर्दंड बसणार आहे़ त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने ही टोल वसुली स्थगित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत सातारा जिल्हा ट्रान्स्पार्ट असोशिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की, गेली ७ दिवस आणेवाडी टोलनाक्याजवळ हजारो वाहने अडकून पडली आहेत़. त्यांना स्थानिकांनी व आम्ही जेवण दिले़. त्यांच्याकडील पैसेही संपून गेले आहेत़. काल सायंकाळनंतर वाहने सोडण्यास सुरुवात केली आहे़. इतके दिवस रोड बंद असल्याने आता तितके दिवस टोल वसुली बंद करणे अपेक्षित होते़. तरीही ही टोल वसुली केली जात आहे़.

राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना त्यांचे काहीही देणेघेणे नाही़ .त्यांनी टोल वसुली करणाऱ्यांना पत्र देऊन टोल थांबविणे भाग होते़. पण त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे़. त्यामुळे पैसे नसलेले वाहनचालक गयावया करताना दिसत असले तरी त्यांच्याकडून टोल वसुल केला जात आहे़. तसेच मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांकडूनही टोल वसुल केला जात असल्याचे गवळी यांनी सांगितले़.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Toll recovery on Pune - Satara Road to vehicles who carrying help for under flood people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.