उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
By Admin | Updated: February 7, 2017 03:24 IST2017-02-07T03:24:35+5:302017-02-07T03:24:35+5:30
पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात अर्ज भरून बंडखोरी केलेल्यांची तसेच अपक्षांची समजूत काढण्याचे प्रयत्न सोमवारी दिवसभर काही इच्छुक उमेदवारांकडून करण्यात येत होते

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस
पुणे : महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात अर्ज भरून बंडखोरी केलेल्यांची तसेच अपक्षांची समजूत काढण्याचे प्रयत्न सोमवारी दिवसभर काही इच्छुक उमेदवारांकडून करण्यात येत होते. त्यांपैकी ४९ जणांनी सोमवारी अर्ज मागे घेतले आहेत. उद्या (मंगळवारी) अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. किती अपक्ष व बंडखोरांकडून अर्ज मागे घेतले जातात, यावर त्या प्रभागांमधील समीकरणे अवलंबून आहेत. त्यामुळे त्याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकांसाठी २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या काळात १६२ जागांसाठी २,६६१ अर्ज निवडणूक कार्यालयांमध्ये जमा झाले आहे. यातील २९९ जणांचे अर्ज आतापर्यंत अवैध ठरले आहेत. घोले रोड, भवानी पेठ या क्षेत्रीय कार्यालयातील अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. उमेदवारी अर्जांची छाननी करण्यासाठी शनिवारचा दिवस निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी सकाळी ११ पासून अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, अनेक उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात आले. त्यामुळे काही निवडणूक कार्यालयांमधील छाननी प्रक्रिया रविवारी पहाटेपर्यंत सुरू राहिली. त्यानंतर पुन्हा रविवार व सोमवार असे दोन दिवस छाननी करण्याची प्रक्रिया सुरूच राहिली.
बंडखोरांची समजूत काढण्यासाठी त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून पालिकेत घेऊ यापासून ते संघटनेतील विविध पदे देण्याचा शब्द दिला जात आहे. काही ठिकाणी बंडखोरांनी ‘अर्थ’पूर्ण माघारीठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.