बारामती : जवळपास दहा वर्षांनी भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला मुहूर्त मिळाला आहे. कारखान्याच्या सभासदत्वाच्या मुद्द्यावर दीर्घ न्यायालयीन लढाईनंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे आणि प्रादेशिक सहसंचालक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नीलिमा गायकवाड यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची दि. ७ एप्रिल रोजी निवडणूक जाहीर होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व स्वीकार करण्याची मुदत दि. ७ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत राहणार असून, पात्र उमेदवार यादी १६ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे. वैध झालेल्या नामनिर्देशन पत्रांची यादी १७ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. १७ एप्रिल ते २ मे पर्यंत आहे. निवडणूक रिंगणात माघार घेतलेले उमेदवार वगळता निवडणूक रिंगणात उतरणारे उमेदवार त्यांची यादी व त्यांना निशाणी वाटपाची मुदत दि. ५ मे रोजी होणार असून, दि. १८ मे रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ यावेळेत मतदान घेतले जाणार आहे. दि. १९ मे रोजी सकाळी ९ वाजता मतमोजणी सुरू होणार असून, याच दिवशी मतमोजणीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. एकूण २१ संचालकाच्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. छत्रपती कारखान्याच्या संचालकांची मुदत २०२० मध्ये संपली होती. मात्र त्यानंतर कोरोनाकाळात निवडणूक पुढे गेली. तसेच न्यायालयीन प्रक्रियेमुळे संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली. दरम्यान, या कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे ‘छत्रपती’च्या निवडणुकीचे एन उन्हाळ्यात रण चांगलेच तापणार आहे. शेतकरी कृती समितीचे नेते पृथ्वीराज जाचक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या निवडणुकीत आव्हान देण्याची तयारी केली आहे.