चाकण : शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा लढा हा केवळ मतांसाठी नसून त्यांच्या वेदना थांबविण्यासाठी आहे, असे ठाम मत माजी मंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केले. गेल्या सहा महिन्यांत जवळपास १,२०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, आतापर्यंत गांधी मार्गाने आंदोलन केले गेले. मात्र, २ ऑक्टोबरनंतर हा लढा गांधी मार्गाने नसेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी यापूर्वी अन्नत्याग, पदयात्रा, चक्काजाम आंदोलने झाली असून, यापुढे पाच शेतकरी हक्क परिषदा घेतल्या जाणार आहेत. यापैकी पहिली परिषद आज आंबेठाण (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, सर्व शेतमालाला किमान हमीभाव, गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४८ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ५८ रुपये दर, २०२५-२६ च्या ऊसगाळप हंगामासाठी प्रतिटन ४,४०० रुपये दर, कांदाउत्पादकांना प्रतिक्विंटल किमान २,५०० रुपये दर, दिव्यांगांना ६,००० रुपये पेन्शन आणि मोफत घरे; ५५ वर्षांवरील शेतकऱ्यांना १०,००० रुपये पेन्शन, मेंढपाळ आणि मच्छीमारांना संरक्षण, बेरोजगार युवकांना नोकऱ्या, उसाच्या थकीत एफआरपीवर न्यायालयाच्या आदेशानुसार १५ टक्के व्याजासह भरपाई आदी मागण्या यावेळी बच्चू कडू यांनी केल्या.
शरद जोशी यांच्या स्मारकासाठी प्रयत्न
बच्चू कडू यांनी शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या अंगारमळा येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला नमन केले. मात्र, त्यांच्या राहत्या घराची आणि परिसराची दुरवस्था पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. ‘सरकारपेक्षा आमची मानसिकता खराब आहे. आम्हाला एक दिवस स्मृतिस्थळी श्रमदान करावे वाटत नाही, ही शरमेची बाब आहे,” असे ते म्हणाले. पुढील काळात सर्वांना एकत्रित करून शरद जोशी यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.