अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षे कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 00:31 IST2019-03-03T00:30:47+5:302019-03-03T00:31:42+5:30
अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षे कारावास
पुणे : अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश एन. के. मणेर यांनी हा आदेश दिला आहे. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्यात यावी, असेही न्यायालयाने आदेशात आहे.
बंडू वसंत वाल्हेकर (वय २४, रा. चिंचवड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने चिंचवड पोलिसात फिर्याद दिली होती. ही घटना २0 फेब्रुवारी २0१६ रोजी पीडितेच्या घरात दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले. पीडित मुलगी, फिर्यादी आणि तपास अधिकारी, अशा तिघांच्याही साक्ष यामध्ये महत्त्वाच्या ठरल्या. पीडित मुलीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोरही १६४नुसार जबाब दिला होता.
घटनेच्या वेळी फिर्यादी घरकामासाठी बाहेर गेल्या असताना बंडू त्यांच्या घरात घुसला. त्याने पीडितेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ७ आणि ८ नुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यावर सुनावणी करत न्यायालयाने शिक्षा सुनावली.