धूळ कमी करण्यासाठी तीन ट्रक करणार पाण्याची फवारणी;स्थायी समितीची मान्यता

By राजू हिंगे | Updated: December 14, 2024 12:39 IST2024-12-14T12:38:59+5:302024-12-14T12:39:38+5:30

शहरात धुळीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे.

Three trucks will spray water to reduce dust; Standing Committee approves | धूळ कमी करण्यासाठी तीन ट्रक करणार पाण्याची फवारणी;स्थायी समितीची मान्यता

धूळ कमी करण्यासाठी तीन ट्रक करणार पाण्याची फवारणी;स्थायी समितीची मान्यता

पुणे : शहराच्या विविध भागांत विकासकामे आणि नवीन बांधकामांमुळे धोकादायक धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने तीन वर्षांपूर्वी तब्बल १ कोटी २ लाख रुपये खर्च करून घेतलेले तीन ट्रक गेल्या तीन वर्षांपासून विनावापर पडून होत्या. अखेर हे ट्रक पाणी फवारणी करून धूळ कमी करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या ८४ लाख ९० हजार रुपयांच्या प्रस्तावास स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

शहरात बांधकाम प्रकल्प, महापालिकेचे उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रस्ते, मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. या बांधकामांसाठी रेडीमिक्स, खडी, माती यांची वाहतूक करणारी वाहने रस्त्याने धावत आहेत. त्यामुळे शहरात धुळीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे.नागरिकांना या धुळीचा त्रास होत आहे. केंद्र सरकारने पुणे महापालिकेला राष्ट्रीय स्वच्छ हवा योजनेतून (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम) धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी निधी दिला आहे. त्यातून ही वाहने खरेदी केली होती.

शहरातील धुलिकणांचे प्रमाण अधिक असलेले कात्रज-कोंढवा रस्ता, खराडी येथील आयटी पार्क रस्ता, तसेच हांडेवाडी ते फुरसुंगी कचरा डेपो समोरील रस्त्यांची स्वच्छता केली जाणार आहे. त्यामध्ये १० किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंचे पादचारी मार्ग, दुभाजक असे एकूण ४० किलोमीटर अंतरात ही यंत्रणा वापरली जाईल. या वाहनासोबत सात हजार लिटर क्षमतेचा टॅंकर असून, टँकरच्या समोरच्या बाजूस चार ठिकाणांवरून फवारणी होईल. त्याचप्रमाणे ट्रकच्या डाव्या आणि उजव्या बाजूने प्रत्येकी दोन आणि गाडीच्या वरच्या बाजूने दोन्ही बाजूस प्रत्येकी चार अशा १६ ठिकाणांवरून पाणी फवारणी होईल.

या पाण्याच्या फवारणीमुळे हे धुलिकण पाण्यासोबत खाली येतील. सुमारे दोन वर्षे ही वाहने वापरली जाणार आहे. त्यासाठी ८४ लाख ९० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, असे या प्रस्तावात नमूद केले आहे.

Web Title: Three trucks will spray water to reduce dust; Standing Committee approves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.