पुणे :उत्तर प्रदेशातील २ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या वादातून ५ जणांच्या टोळीने तिघांवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत कलामुद्दीन जमील अहमद (वय २१), अमीर छब्बन खान आणि अबरार ईसाक खान (रा. कोंढवा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी, कलामुद्दीन अहमद (रा. कोंढवा) यांनी फिर्यादी दिली आहे. कोंढवा पोलिसांनी शराफत अली (वय २२), शकिल खान, कलीम खान आणि त्यांचे इतर दोन साथीदार अशा पाचजणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील भैरवनाथ मंदिराजवळील बस स्टॉपजवळ गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता घडली.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून, एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या गावी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात वाद झाले होते. त्याचा राग मनात धरून फिर्यादी हे रस्त्याने पायी चालत निघाले असता शकिल व कलीम याच्या सांगण्यावरून शराफत अली याने त्यांना चाकूने वार करून गंभीर जखमी केले. सहायक पोलिस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.