एरंडवणे भागात भरधाव महिला कार चालकाने तीन शाळकरी मुलींना उडवले; एकीची प्रकृती गंभीर
By नम्रता फडणीस | Updated: November 4, 2023 18:46 IST2023-11-04T18:46:42+5:302023-11-04T18:46:56+5:30
Pune Accident News: रंडवणे भागातील गुळवणी महाराज रस्त्यावर भरधाव वेगातील महिला कार चालकाने तीन शाळकरी मुलींना उडविल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली.

एरंडवणे भागात भरधाव महिला कार चालकाने तीन शाळकरी मुलींना उडवले; एकीची प्रकृती गंभीर
- नम्रता फडणीस
पुणे - एरंडवणे भागातील गुळवणी महाराज रस्त्यावर भरधाव वेगातील महिला कार चालकाने तीन शाळकरी मुलींना उडविल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. या अपघातात तीन मुली गंभीर झाल्या. त्यातील एक मुलगी कारच्या खाली सापडली. तिला सुखरूप बाहेर काढले पण तिची प्रकृती गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. महिला चालकावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
कोथरुडमधील निंबाळकर बागेकडून भरधाव वेगात महिला कारचालक एरंडवणे भागातील गणेशनगरकडे निघाली होती. शाळकरी मुली पदपथावरुन चालल्या होत्या. गुळवणी महाराज रस्त्यावर रिव्हाइव्ह केअर अँड ब्युटी स्टुडिओ या दुकानासमोर चालक महिलेचे कारवरील नियंत्रण सुटले. मोटार पदपथावर शिरली. पदपथावरुन निघालेल्या तीन मुलींपैकी दोघी फेकल्या गेल्या. एक मुलगी कारखाली सापडल्याने गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मुलगी कारखाली सापडून ही महिला कारमध्येच बसून होती. मी वेगात कार चालवत नव्हते असे ती रडून सांगत होती. अपघातानंतर नागरिकांनी तिघींना तातडीने एरंडवणे भागातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती अलंकार पोलिसांना कळविण्यात आली. अपघातानंतर मोटार चालक महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.