पुणे : पुणे जिल्ह्यात हडपसर, चाकण आणि हिंजवडी अशा तीन महापालिका कराव्या लागतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी पुण्यात सांगितले. त्यानंतर पुण्यात तीन नाही, तर एकच नवीन महापालिका करण्याची चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे नवीन महापालिका तीन की, एक? यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी पहाटेच्या सुमारास चाकण चौक परिसराची पाहणी केली. त्यावेळी नजीकच्या काळात चाकण, मांजरी, फुरसुंगी, उरुळी देवाची व हिंजवडीसाठी तीन महापालिका कराव्या लागतील, असे म्हटले होते.
मुख्यमंत्री म्हणाले, सध्या निकड आहे का?अजित पवार यांनी नव्या तीन महापालिकांची घोषणा करून काही तास उलटत नाही, तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत विधान केले. पत्रकारांशी बाेलताना ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महापालिका असून, अजून एक नवी महापालिका करण्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. आता तरी ‘पीएमआरडीए’ केल्याने सध्या त्याची निकड आहे का? याचा विचार करावा लागेल; पण ज्या प्रकारे पुणे जिल्ह्यात शहरीकरण सुरू आहे ते पाहता भविष्यात कधीतरी विचार करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.