दौंडला स्वच्छतागृहाची टाकी फुटून तीन स्फोट
By Admin | Updated: March 16, 2016 08:38 IST2016-03-16T08:38:15+5:302016-03-16T08:38:15+5:30
दौंडच्या नेहरू चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील मैला टाकी फुटून मंगळवारी तीन स्फोट झाले. सुदैवाने सफाई कामगार मीराबाई भिवराज धनवे व राजू आहिरे हे दोघे बचावले.

दौंडला स्वच्छतागृहाची टाकी फुटून तीन स्फोट
दौंड : दौंडच्या नेहरू चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहातील मैला टाकी फुटून मंगळवारी तीन स्फोट झाले. सुदैवाने सफाई कामगार मीराबाई भिवराज धनवे व राजू आहिरे हे दोघे बचावले. ते बाहेर पडताच हा स्फोट झाला. मात्र या घटनेमुळे संतप्त सफाई कामगारांनी मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घातला.
परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे लक्षात घेऊन नगर परिषदेने पोलीस संरक्षण बोलावले. मात्र कामगरांनी मुख्याधिकाऱ्यांना प्रश्नांचा भडीमार करीत होते.
दौंड-सिद्धटेक रोडवर हे स्वच्छतागृह नगर परिषदेच्या सफाई कामगार वसाहतीजवळ आहे. ते वेळीच साफ केले जात नाही... दुर्गंधी सुटते... यामुळे वेळोवेळी निवेदन कर्मवीर व्यायाम मंडळ, कर्मवीर मित्रमंडळ, दुर्गामाता सेवा ट्रस्ट यांच्यासह नगर परिषदेला सफाई कामगारांनी दिले होते.
त्यामुळे स्फोटाच्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांनी आले पाहिजे, या भूमिकेवर या भागातील रहिवासी ठाम होते. एकंदरीतच नगर परिषदेतील तणावाचे वातावरण पाहता मुख्याधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी नगरसेवक बादशाह शेख उपस्थित होते. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. तेथेही रहिवाशांनी मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला. त्यानंतर नगर परिषदेने तातडीने स्वच्छतागृहाच्या टाकीची साफसफाई सुरू केली. त्यामुळे काहीसे वातावरण निवळले. मात्र जोपर्यंत आम्हाला नगर परिषद हक्काच्या सुविधा देत नाही तोपर्यंत सफाई कामगार आणि या परिसरातील रहिवासी शांत बसणार नाही. वेळ आल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलनदेखील केले जाईल, असा इशारा देण्यात आला. (वार्ताहर)
अनर्थ टळला
दौंड-सिद्धटेक रस्त्यावर भरवस्तीत हे स्वच्छतागृह आहे. या रस्त्यावर वाहनांची आणि रहिवाशांची वर्दळ असते. स्वच्छतागृहातील टाकीचा स्फोट झाला त्या वेळेस रस्त्यावर कोणीही नव्हते. स्वच्छतागृहातून सफाई कामगार मीराबाई धनवे नुकत्याच बाहेर आल्या होत्या. त्यामुळे या भागातील पुढील अनर्थ टळला.
गैरसोय होणार नाही
मुख्याधिकारी शिवाजी कापरे म्हणाले, की घडलेली घटना दुर्दैवी आहे. मात्र असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, याची दखल घेतली जाईल. दरम्यान, स्फोट झालेल्या स्वच्छतागृहाच्या कामकाजाला तातडीने सुरुवात केली आहे, की जेणेकरून या भागातील रहिवाशांची गैरसोय होणार नाही.