- हिरा सरवदे
पुणे : सिंहगड रस्तावरील पु. ल. देशपांडे उद्यानात महापालिकेने साकारलेल्या ‘कलाग्राम’ प्रकल्पाच्या परिसरात दारूच्या ओल्या पार्ट्या होत असल्याचे आणि त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे वृत्त दैनिक ‘लोकमत’ने बुधवारी प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर महापालिकेचा भवन विभाग, मालमत्ता विभाग आणि सांस्कृतिक विभागाने प्रकल्प आपल्या ताब्यात नसल्याचे सांगत टोलवाटोलवी करण्यास सुरुवात केली आहे. प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असतानाही आतमध्ये दारू पार्टी होतेच कशी, या प्रश्नांवर मात्र कोणीच बोलत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांंना नेमकी भीती कुणाची आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील पानमळा येथे तब्बल २७ एकर जागेवर पु. ल. देशपांडे उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानामध्ये जपानी शैलीचे आणि मुघल शैलीचे गार्डन आणि राज्य व देशातील ग्रामीण कलाकृती व लोककला मांडणारे कलाग्राम प्रकल्प साकारण्यात आले आहे. यासाठी तब्बल २२ कोटी रुपये खर्च केला आहे. या कलाग्राम प्रकल्पाचे उद्घाटन १३ ऑक्टोबर २०२४ रोजी झाले. त्याला साडेतीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही हा प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही.
प्रकल्पाच्या बंद असलेल्या प्रवेशद्वारावर महापालिका प्रशासनाने सुरक्षारक्षक नेमले; मात्र आतील वास्तू व परिसराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. प्रकल्पामध्ये तळीरामांकडून दारूच्या ओल्या पार्ट्या केल्या जात आहेत. थंडीमुळे शेकोटीजवळ बसून दारू पार्ट्या रंगत असल्याच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात. यासंदर्भात दैनिक ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनामध्ये गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.
कलाग्राम प्रकल्प तयार करून तो सांस्कृतिक विभागाकडे वर्ग केला आहे. त्यामुळे त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सांस्कृतिक विभागाची असल्याचे भवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर प्रकल्प आमच्याकडे नाहीय. अद्याप प्रकल्पाचे पझेशन झालेले नाही, हा प्रकल्प सध्या मालमत्ता विभागाकडे असल्याचे सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे मालमत्ता विभागाचे अधिकारी म्हणतात, कोणताही प्रकल्प आमच्या ताब्यात नसतो. प्रकल्पाशी आमचा संबंध केवळ नोंदणीपुरताच येतो. महिनाभरापूर्वीच ताब्यासंदर्भातील पत्र संबंधित विभागांना दिल्याचे सांगण्यात आले.
ओल्या पार्ट्यांचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच
कलाग्राम प्रकल्पाचा ताबा व जबाबदारीवरून भवन, मालमत्ता व सांस्कृतिक विभागाकडून टोलवाटोलवी सुरू असताना, प्रवेशद्वारावर चोवीस तास सुरक्षारक्षक तैनात असताना आतमध्ये दारूच्या पार्ट्या झाल्या कशा, त्यावेळी सुरक्षारक्षक काय करत होते, या प्रश्नावर तीनही विभागांचे अधिकारी काहीच बोलले नाहीत. चौकशी करण्याचे आश्वासनही दिले नाही. त्यामुळे ओल्या पार्ट्यांचा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.
कलाग्रामसंदर्भात वृत्त वाचल्यानंतर या प्रकल्पाची जबाबदारी तातडीने सांस्कृतिक विभागाकडे सोपविण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. यापुढे तेथील स्वच्छता व इतर जबाबदारी सांस्कृतिक विभागाची असेल. - पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका