पोलिसाला गोळ्या घालण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 21:40 IST2018-04-17T21:40:54+5:302018-04-17T21:40:54+5:30
हिंजवडी येथील हॉटेल सनराईजसमोर भांडण सुरू असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. हे समजल्यानंतर रात्रपाळीस असलेले दळवी घटनास्थळी पोहचले.

पोलिसाला गोळ्या घालण्याची धमकी
पुणे : भांडणाबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दि. १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिस शिपाई मोहन दळवी (वय २९) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमेश सुर्यकांत साखरे (वय २८) आणि शरद तुकाराम हुलावळे (वय २९, दोघेही रा. हिंजवडी) यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. हिंजवडी येथील हॉटेल सनराईजसमोर भांडण सुरू असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. हे समजल्यानंतर रात्रपाळीस असलेले दळवी घटनास्थळी पोहचले. यावेळी साखरे याने त्यांना तिथून निघून जाण्याचे सांगत गोळ््या घालण्याची धमकी दिली. तर हुलावळे यानेही त्यांना धक्काबुक्की करून ढकलून दिल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. घटनेच्या पुढील तपासासाठी सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी केली.
--------