पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी केलं सामुहिक अथर्वशीर्ष पठण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 13:38 IST2017-09-22T13:35:27+5:302017-09-22T13:38:09+5:30
शुक्रवारी सकाळी नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची माळ विध्यार्थ्यांच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने गुंफली .

पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी केलं सामुहिक अथर्वशीर्ष पठण
पुणे : आकाशात घुमणारा शंखनाद अन् ढोल ताशाच्या गजरात हजारो विद्यार्थ्यांच्या मुखातून श्री सुक्त व अथर्वशीर्ष पठणाचा स्वर शुक्रवारी सकाळी निनादला. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग नवरात्रोत्सवतर्फे शुक्रवारी सकाळी नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची माळ विध्यार्थ्यांच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठणाने गुंफली .
गणेश कला क्रिडा रंगमंचाच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरांतील विविध शाळांतील विद्यार्थी उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्याने मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेता पुष्कर श्रोत्री, भाग्यश्री संकपाळ, गायिका मुग्धा वैशंपायन, प्राजक्ता गायकवाड, महालक्ष्मी मंदीरचे मुख्य संस्थापक विश्वस्त राजकुमार अगरवाल, मुख्य विश्वस्त अमिता अगरवाल, विश्वस्त प्रताप परदेशी, भारत अगरवाल, तृप्ती अगरवाल, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजमाला गोयल, बांधकाम व्यावसायिक राजेश सांकला आदी उपस्थित होते.
सभागृहामध्ये पहाटे साडे पाच वाजल्यापासून विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. विध्यर्थ्यांच्या गर्दीने सभागृह फुलून गेले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वरूपवर्धिनीच्या ढोल-ताशा पथकाने आपल्या वादनाने सभागृह दणाणून सोडले. त्यापाठोपाठ मधुकर सिधये आणि त्यांच्या सहकाºयांनी शंखनाद केला. शंखांनादाच्या ध्वनीत सादर केलेल्या प्रार्थनेस उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यानंतर गणेश स्तवन, ओंकार वंदनेने भक्तमय वातावरण निर्माण केले. त्यापाठोपाठ विद्यार्थ्यांनी गायत्री मंत्राचे पठण, अथर्वशीर्ष पठण, श्री सूक्त पठण केले. यानंतर गणरायाच्या आरतीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.