पुण्यात मास्क बंधनकारक करणार; वापर न केल्यास हजार रुपये दंड आकारणार : अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 01:00 PM2020-08-28T13:00:50+5:302020-08-28T13:49:51+5:30

पुणे, पिंपरी-चिंचवडकरांना मास्क बंधनकारक करणार

Thousands of rupees fine for not using mask in the pune : Ajit Pawar | पुण्यात मास्क बंधनकारक करणार; वापर न केल्यास हजार रुपये दंड आकारणार : अजित पवार 

पुण्यात मास्क बंधनकारक करणार; वापर न केल्यास हजार रुपये दंड आकारणार : अजित पवार 

Next
ठळक मुद्देकोरोनाविरूद्धच्या या लढाईत सातत्य टिकवले तरच रुग्ण आढळण्याचा आलेख खाली उतरेल

पुणे (पिंपरी) : महाराष्ट्रातील काही भागात अद्यापही मास्कचा वापर केला जात नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात मास्क बंधनकारक करून मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकारण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत बैठकीत चर्चा करू, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड येथे आटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्धाटन शुक्रवारी झाले. त्यावेळी पवार बोलत होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर उषा ढोरे, आमदार चंद्रकांत पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,  पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापालिकचे सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके आदी या वेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. येथील नागरिकांना किफायतशीर दरात उपचार मिळाला पाहिजे. ग्रामीण भाग देखील आपलाच आहे. त्यामुळे या कोविड सेंटरमध्ये खेड, जुन्नर, शिरूर, मावळ यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देखील रुग्ण दाखल केले जातील. कोरोनाविरूद्धच्या या लढाईत सातत्य टिकवले तरच रुग्ण आढळण्याचा आलेख खाली उतरेल. 

एक लाखापेक्षा जास्तीच्या बिलांची पडताळणी
अव्वाच्यासव्वा बिले आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. एक लाखांपेक्षा जास्तीचे बिल असल्यास त्याची पडताळणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होत आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

बैठकीत ठरणार धोरण
कोविड सेंटरच्या उद्घाटनाच्या भाषणात बोलताना अजित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्रात काही भागात मास्कचा वापर नागरिकांकडून होत नाही. त्यांना मास्क बंधनकारक केले पाहिजे. याबाबत दुपारी पुणे येथे बैठक होणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात मास्कचा वापर न केल्यास हजार रुपये दंड आकरण्याचा विचार सुरू आहे. बैठकीत त्याबाबत चर्चा करू.

Web Title: Thousands of rupees fine for not using mask in the pune : Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.