'वसंतदादांचे सरकार मी पाडले', शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 21:11 IST2025-08-16T21:10:34+5:302025-08-16T21:11:19+5:30
राजकीय संस्कृती बिघडली असल्याची व्यक्त केली खंत

'वसंतदादांचे सरकार मी पाडले', शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली
पुणे: संसदेचे अधिवेशन सुरू होऊन १४ दिवस झाले, मात्र एक मिनिटही कामकाज चालले नाही. ही स्थिती चिंताजनक आहे. देशाची एकता लोकशाही टिकवायची असेल तर महात्मा गांधी नेहरू यांचा विचार मानणाऱ्यांनी एकत्र यायला हवे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. देशभरातील ३०० खासदार एकत्र येऊन मोर्चा काढतात, तर त्यांना अटक केली जाते असे ते म्हणाले.
काँग्रेसचे नेते, माजी आमदार उल्हास पवार यांच्या सहस्रचंद्र दर्शन कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते उल्हास पवार यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सॅटर्डे क्लबच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पंढरपूर देवस्थानचे गहिनीनाथ औसेकर, माजी आमदार धीरज देशमुख, साहित्यिका डॉ. अरूणा ढेरे उपस्थित होते. पवार यांच्या पत्नी अनुराधा पवार यांचा डॉ. ढेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शरद पवार यांनी यावेळी जुन्या राजकीय वातावरणाच्या आठवणी जागवल्या व सद्य राजकीय स्थितीबद्दल चिंता व्यक्त केला. सत्कारमुर्ती उल्हास पवार यांनीही त्याला दुजोरा देत सध्याच्या राजकारणाने व राजकीय व्यक्तींनीही पातळी सोडली असल्याची टिका केली.
वसंतदादांचे सरकार मी पाडले
शरद पवार यांनी सांगितले की, ज्यांनी देशाचे नेतृत्व केले, घरादाराचा विचार केला नाही, पंचशील सारखे तत्व जगाला दिले, त्यांचे नावही घेतले जात नाही. हे सगळे अस्वस्थ करणारे आहे. ज्या वसंतदादा यांचे सरकार मी पाडले, त्याच दादांनी पुढे १० वर्षांनंतर पक्षात नेतृत्वाचा विचार आला त्यावेळी माझे नाव घेतले. असा विचार करणारे नेते होते. आता द्वेषाचे, सुडाचे राजकारण केले जाते.
माजी मंत्री थोरात म्हणाले, “लोकांच्या मनातील आदराचे स्थान अढळपदासारखे टिकवणे ही अवघड गोष्ट उल्हास पवार यांनी केली आहे.” धीरज देशमुख यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उल्हास पवार यांच्यातील मैत्रीचे बंध उलगडून दाखवले. औसेकर यांनी पवार यांच्या वारकरी असण्याचे संदर्भ दिले तर डॉ. ढेरे यांनी पवार यांच्या रसिकतेचे दाखल देत, आनंद लुटणारा व तो लुटवू देणारा असे पवार असल्याचे सांगितले. प्रा. मिलिंद जोशी लिखित मानपत्राचे डॉ. सतीश देसाई यांनी वाचन केले.
सत्काराला उत्तर देताना उल्हास पवार यांनी शरद पवार यांच्या भाषणातील राजकीय संस्कृती बिघडली असल्याचे जूनीनवी उदाहरणे देत स्पष्ट केले. तरीही गांधी नेहरू यांनी दाखवलेली वाट असल्याने देशाला १०० टक्के आशा आहे असेही दोन्ही पवार यांनी नमुद केले. अंकूश काकडे यांनी प्रास्तविक केले. श्रीकांत शिरोळे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला माजी खासदार अशोक मोहोळ, आमदार बापू पठारे, निवेदन सुधीर गाडगीळ तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाणांसमोर प्रथमच भाषण केले. चव्हाण यांनी त्याचे जाहीर कौतुक केले व नंतर हळुच सांगितले वैयक्तिक टीका कधीही करायची नाही. हा संस्कार आहे. आता पीएचडी झालेल्यांची सभागृहातील भाषणे म्हणजे चक्क शिव्या असतात, त्या ऐकल्या तेव्हापासून पीएचडी करणाऱ्यांची भीतीच वाचायला लागली असे उल्हास पवार यांनी सांगताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.