वयाच्या ९९ व्या वर्षी हा गौरव काश्मिरी जनतेचा..!

By श्रीकिशन काळे | Updated: December 28, 2024 16:20 IST2024-12-28T16:19:26+5:302024-12-28T16:20:06+5:30

लेखक प्राण किशोर कौल : साहित्य अकादमीतर्फे सर्वोच्च फेलोशिपने पुण्यात गौरव

This is the pride of the Kashmiri people at the age of 99 | वयाच्या ९९ व्या वर्षी हा गौरव काश्मिरी जनतेचा..!

वयाच्या ९९ व्या वर्षी हा गौरव काश्मिरी जनतेचा..!

पुणे : वयाच्या 99 व्या वर्षी साहित्य अकादमीने सर्वोच्च फेलोशिप प्रदान करून केलेला हा गौरव फक्त माझा एकट्याचा नसून काश्मिरी जनता, काश्मिरमधील साहित्यिक आणि काश्मिरी भाषा बोलणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे, अशा भावना काश्मिरी लेखक, दिग्दर्शक, नाटककार आणि चित्रकार प्राण किशोर कौल यांनी व्यक्त केल्या.

दिल्लीस्थित साहित्य अकादमीतर्फे प्राण किशोर कौल यांचा नुकताच पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च फेलोशिप देऊन गौरव करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासह देशातील निवडक साहित्यिकांना या पूर्वी ही फेलोशिप देऊन गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळविणारे कौल हे दुसरे काश्मिरी साहित्यिक आहेत. पहिला पुरस्कार प्रो. रहमान राही यांना मिळाला होता.

कुटुबियांच्या उपस्थितीत प्राण किशोर कौल यांचा शाल आणि ताम्रपट देऊन साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. माधव कौशिक आणि सचिस डॉ. के. श्रीनिवास राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरहदचे अध्यक्ष संजय नहार उपस्थित होते.

प्राण किशोर कौल म्हणाले, आयुष्यात साहित्य अकादमी फेलोशिप मिळण्याचा क्षण येईल अशी मी कल्पनाही केली नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रादेशिक भाषांचा विस्तार साहित्य अकादमीच्या प्रयत्नांमुळे होऊ शकला. 1998 साली माझ्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतरही मी विपुल लेखन करीत असताना साहित्य अकादमीशी जोडलेलो होतो. माझ्या कारकिर्दीवर चित्रपट बनविला गेला हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण होता. ’’

प्राण किशोर कौल यांच्या कार्याचा गौरव करून साहित्यिक डॉ. माधव कौशिक म्हणाले, प्राण किशोर कौल यांनी विविध माध्यमांमधून आपली अभिव्यक्ती प्रदर्शित केली. साहित्यकृती साकारताना चित्रपट निर्मिती, चित्रकृतींच्या माध्यमातूनही ते व्यक्त झाले आहेत. प्राण किशोर कौल हे काश्मिरी संस्कृतीचे प्राणतत्त्वच सिद्ध झाले आहेत. प्राण किशोर कौल यांच्या साहित्यकृती हिमालयासारख्या उंच तर आहेतच त्याच वेळेला त्या नदीच्या खळखळाटासारख्याही भासतात. पद्यरूपी गद्याची लेखनशैली हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. 

Web Title: This is the pride of the Kashmiri people at the age of 99

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.