तेरा वर्षांच्या मुलाने मित्राचा खून करून जमिनीत गाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:14 IST2021-02-05T05:14:10+5:302021-02-05T05:14:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लहान मुलाच्या खेळाच्या भांडणातून १३ वर्षांचा मुलाने ११ वर्षांच्या मुलाला खून केल्याचा प्रकार समोर ...

A thirteen-year-old boy murdered a friend and buried him in the ground | तेरा वर्षांच्या मुलाने मित्राचा खून करून जमिनीत गाडले

तेरा वर्षांच्या मुलाने मित्राचा खून करून जमिनीत गाडले

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लहान मुलाच्या खेळाच्या भांडणातून १३ वर्षांचा मुलाने ११ वर्षांच्या मुलाला खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. केळेवाडीमध्ये ही घटना २९ जानेवारी रोजी दुपारी घडली होती. कोथरूड पोलिसांनी १३ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. मैदानात खेळत असताना झालेल्या वादात ढकलून दिल्यानंतर डोक्यावर पडून मुलगा जखमी झाला. घरचे रागवतील म्हणून त्या मुलाच्या डोक्यात आणखी दगड घालून त्याला अर्धा गाडल्याचे समोर आले होते.

विश्वजित विनोद वंजारी (वय ११, रा. केळेवाडी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. विश्वजित हा २९ जानेवारी सायंकाळी खेळायला जातो, असे सांगून बाहेर गेला होता. त्यानंतर तो परत आला नव्हता. त्याच्या आई-वडिलांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. कोथरूड पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. त्याच्या घरापासून सुमारे ५०० मीटरवर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये दगडाने त्याचा मृतदेह झाकून ठेवलेल्याचे ३१ जानेवारी रोजी पोलिसांना आढळून आले होते. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता.

याबाबत कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मेघश्याम डांगे यानी सांगितले, की मुलगा बेपत्ता झाल्यापासून त्याचा कसून शोध सुरू होता. त्याचा मृतदेह आढळल्यानंतर डोक्याला मार लागल्यामुळे खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आरोपीचा शोध सुरू होता. मुलगा शेवटी कोणासोबत होता त्यावरून तपास करताना १३ वर्षांच्या मुलावर संशय निर्माण झाला. त्यामुळे त्याबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले. विश्वजित व आरोपी अल्पवयीन मुलगा हा मित्र होते. ते दोघे एकत्र खेळायचे. त्यावेळी त्यांच्यात वादावादी होत होती. घटनेच्या दिवशी देखील दोघे खेळत होते. त्यावेळी विश्वजित याने त्याला चिडविले. खेळताना सतत मला एकटे पाडतात, असे म्हणून त्यांच्यात वादावादी झाली. यावेळी पकडापकडीत आरोपीने विश्वजितचे नाक दाबले. त्यानंतर त्याला धक्का दिला. त्या ठिकाणी असलेल्या विटावर तो पडल्यामुळे डोक्याला गंभीर जखम झाली. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्यामुळे आरोपी मुलगा घाबरला. आता घरचे रागवतील म्हणून त्याने आणखी एक दगड त्याच्या डोक्यावर टाकला. तो दिसू नये म्हणून त्याच्या अंगावर बाजूने दगडे रचली. त्या ठिकाणी सिंमेटचा राडारोडा टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुलास ताब्यात घेतले असून त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हा विधीसंघर्षित मुलगा शाळा शिकत होता. पोलीस उपनिरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A thirteen-year-old boy murdered a friend and buried him in the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.