Maharashtra: दहा वर्षांत पाच पटींनी वाढले तृतीयपंथी मतदार, ठाण्यात सर्वांधिक मतदारांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 12:45 PM2024-04-16T12:45:37+5:302024-04-16T12:46:29+5:30

गेल्या १० वर्षांत ही संख्या आता ५ हजार ६१७ इतकी झाली आहे. ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे....

Third-party voters increase five-fold in ten years, Thane records all-round voters | Maharashtra: दहा वर्षांत पाच पटींनी वाढले तृतीयपंथी मतदार, ठाण्यात सर्वांधिक मतदारांची नोंद

Maharashtra: दहा वर्षांत पाच पटींनी वाढले तृतीयपंथी मतदार, ठाण्यात सर्वांधिक मतदारांची नोंद

पुणे : देशात २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पुरुष-महिला मतदारांची स्वतंत्र नोंद केली जात होती. मात्र, तृतीयपंथींची वेगळी नोंद होत नव्हती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष व महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली. त्यावेळी राज्यात ९१८ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली होती. गेल्या १० वर्षांत ही संख्या आता ५ हजार ६१७ इतकी झाली आहे. ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.

राज्यात २०१४ मध्ये ९१८ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली. त्यानंतर झालेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीनुसार हा आकडा दुपटीने वाढून ही संख्या २ हजार ८६ इतकी झाली. त्यानंतर सध्या लोकसभा निवडणुकीसाठी ४ एप्रिलपर्यंत करण्यात आलेल्या राज्याच्या एकूण मतदार संख्येत ५ हजार ६१७ तृतीयपंथी मतदार आहेत. सर्वांत जास्त तृतीयपंथी मतदारांची नोंद ठाणे जिल्ह्यात करण्यात आली असून येथे १ हजार २७९ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. मुंबई उपनगरमध्ये ८१२ आणि पुण्यात ७२८ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.

यावर्षी गोंदियामध्ये १०, गडचिरोलीत ९, हिंगोलीमध्ये ७, भंडाऱ्यात ५ आणि सिंधुदुर्गमध्ये १ तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. तृतीयपंथी कार्यकर्ते गौरी सावंत, प्रणीत हाटे आणि झैनाब पटेल हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१४ मध्ये तृतीयपंथी मतदारांना प्रथम मतदानाचा अधिकार मिळाला आणि तेव्हापासूनच तृतीयपंथी अशा स्वतंत्र वर्गवारीत या समूहाची नोंद करण्यात येऊ लागली. २०१९ मध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मतदारांची संख्या दुप्पटीने वाढली असल्याचे दिसून आले होते. तर २०२४ मध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत दुपटीपेक्षाही अधिक तृतीयपंथी मतदार संख्या वाढली आहे. याचाच अर्थ आज तृतीयपंथी सुद्धा आपल्या मतदानाच्या हक्काबाबत सजग असून मतदान नाव नोंदणीसाठी पुढे येत आहेत.

Web Title: Third-party voters increase five-fold in ten years, Thane records all-round voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.