ते निघाले अन् ४ ते ५ तासात पहलगाममध्ये दहशवाद्यांचा हल्ला झाला; पुण्यातील ५७ पर्यटक बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 18:48 IST2025-04-24T18:46:42+5:302025-04-24T18:48:09+5:30
हल्ल्याच्या दिवशी आम्ही त्याठिकाणी असतो तर आज दिसलो नसतो, केवळ नशीब बलवत्तर म्हणून आम्ही सुखरूप घरी आलो

ते निघाले अन् ४ ते ५ तासात पहलगाममध्ये दहशवाद्यांचा हल्ला झाला; पुण्यातील ५७ पर्यटक बचावले
अवसरी (पुणे) : जम्मु काश्मीर येथील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण भारत देश हादरला असून या हल्ल्याचे सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. या हल्ल्यात देशातील विविध राज्यातील पर्यटकांचा मृत्यू झाला असून या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र या दहशतवादी हल्ल्यात आंबेगाव तालुक्यातील ५७ पर्यटक केवळ चार ते पाच तासापूर्वी अगोदर घटनास्थळावरून निघाल्याने थोडक्यात बचावले आहेत.
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील शरद बँकेचे मुख्य व्यवस्थापक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव, जुन्नर, शीरुर तालुक्यातील ५७ पर्यटक जम्मू-काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. त्यामध्ये ७ लहान मुले २८ पुरुष , २२ महिला असा एकुण ५७ जणांचा समावेश होता. सर्व पर्यटक दिनांक १३/४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी निघाले होते. ते जम्मू तावी झेलम ट्रेनने गेले प्रथम श्रीनगर येथे मुक्काम करुन ट्युलिप गार्डन, सोनमर्ग, गुलमर्ग ही ठिकाणे केल्यानंतर सर्व पर्यटक दि. १९/४/२०२५ रोजी पहेलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी तेथील आरु व्हॅली, बेताब व्हॅली, आणि चंदनवारी येथील साईड सीन पाहून त्या दिवशी तेथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ते वैष्णोदेवी दर्शनास निघाले व ते निघाल्यानंतर चार ते पाच तासातच मागे दहशतवाद्यांनी हल्ला करत २८ हिंदू बांधवांचा जीव घेतला.
जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी गेलेले पर्यटक हे आंबेगाव, जुन्नर, शिरूर, तालुका पुणे, नगर या भागातील नोकरदार व्यापारी शेतकरी वर्गातील २५ जोडपी ट्रीप साठी गेली होती. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी सर्व पर्यटक फिरण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणावरून निघाल्यानंतर काही वेळातच बातम्यांना त्या ठिकाणी हल्ला झाल्याचे समजले त्यानंतर कुटुंबियांनी फोन करून तुम्ही सुरक्षित आहे का? असे विचारले मात्र आम्ही सुरक्षित आहे हे सांगितल्यानंतर सर्व पर्यटकांचे कुटुंबीय यांनी सुटकेचा निश्वास सोडला. गुरुवारी रात्री सर्व पर्यटक सुखरूपृत्या घरी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. मात्र दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा पूर्ण प्लॅनिंग केला होता कुठल्या क्षणी हल्ला होऊ शकत होता. आम्ही दिनांक १९ रोजी त्या ठिकाणी उपस्थित होतो. हल्ल्याच्या दिवशी जर आम्ही तिकडं असतो तर आज इथं दिसलो नसतो. केवळ नशीब बलवत्तर व देवाची कृपा म्हणून आम्ही सुखरूप घरी आलो असे शरद बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक किसन शिंदे यांनी सांगितले.