बारामती तालुक्यात विमानतळ होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST2021-06-26T04:09:23+5:302021-06-26T04:09:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सुपे : बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावात आंतराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित असल्याचे वृत्त ...

There will be no airport in Baramati taluka | बारामती तालुक्यात विमानतळ होऊ देणार नाही

बारामती तालुक्यात विमानतळ होऊ देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

सुपे : बारामती तालुक्यातील चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावात आंतराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. मात्र, या बाबत अद्यापही अधिकृत माहिती नाही. मात्र असे झाले तर या विमानतळाला आमचा विरोध राहील. कारण आमच्या बागायती जमिनी यात जाणार असून आम्ही भूमिहीन होण्याची शक्यता आहे. यामुळे आम्ही विमानतळ होऊ देणार नाही असा पवित्रा चांदगुडेवाडी आणि भाेंडवेवाडी ग्रामस्थांनी घेतला. या बाबतचे निवेदन त्यांनी तालुक्याचे प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना दिले आहे.

पुरंदर तालुक्यात हे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित होते. मात्र, विमानतळाची नियोजित जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी करण्याच्या बातम्या वर्तमानपत्रात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानुसार बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी आणि आंबी खुर्द आदी गावांचा यामध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. मात्र, हा प्रयत्न बारामती तालुक्यातील गावे हाणून पाडतील असा इशारा या परिसरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी दिला.

नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी या गावातील जमिनी घेण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही सर्वेक्षण झालेले नाही. प्रशासनाकडून आम्हाला तशी कोणत्याही प्रकारची लेखी अथवा तोंडी माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र वर्तमानपत्रामध्ये या भागातील जमिनी जिरायती असल्याने याठिकाणी विमानतळ होण्यास हरकत नसल्याचे आले होते. ही माहिती पूर्णत: खोटी आहे. याठिकाणी मागील सहा वर्षांपासून जनाई उपसा योजनेचे पाणी येत असल्याने येथील बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. यामुळे येथील जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे.

चौकट

गेली पाच ते सहा वर्षांपासून या भागात नियमित येत आहे. तसेच चांदगुडेवाडी गावाच्या दक्षिण बाजूने कऱ्हा नदी वाहत आहे. त्यामुळे चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावातील संपूर्ण क्षेत्र हे बागायत स्वरूपाचे झाले आहे. या परिसरात ऊस, कांदा, गहू, टोमॅटो इत्यादी नगदी स्वरूपाची पिके घेण्यात येत आहेत. तसेच डाळिंब, पेरू, सिताफळ इत्यादी फळबागा देखील मोठया प्रमाणात घेतल्या जात आहेत. तसेच या गावामध्ये २५ ते ३० शेततळी देखील शेतकऱ्यांनी तयार केलेली आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी माळरान जमिनीसुद्धा मोठ्या कष्टाने बागायती केलेल्या आहेत.

चौकट

या गावातील बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. तसेच चांदगुडेवाडी व भोंडवेवाडी गावामध्ये शेती बरोबर पशुपालन व पोल्ट्री व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात असून त्यामधून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळत आहे. अशी माहिती प्रांताधिकारी व तहसिलदारांना ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही गावांनी एकत्र येवून बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळास तीव्र विरोध दर्शविला आहे.

फोटो ओळी : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास तीव्र विरोध असल्याचे तहसिलदारांना निवेदन देताना ग्रामस्थ.

२५०६२०२१-बारामती-१२

Web Title: There will be no airport in Baramati taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.