आगामी काळात मंत्री पदासाठी भाजपमध्ये मारामाऱ्या होतील; अमोल मिटकरींचे भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 18:18 IST2022-07-24T18:18:35+5:302022-07-24T18:18:47+5:30
शिंदे-फडणवीस हे दीड दोन महिन्याचे मंत्री

आगामी काळात मंत्री पदासाठी भाजपमध्ये मारामाऱ्या होतील; अमोल मिटकरींचे भाकीत
बारामती : शिंदे-फडणवीस हे दीड दोन महिन्याचे मंत्री आहेत. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. आगामी काळात भाजपच्या नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी मारामाऱ्या होतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.
बारामती येथे रविवारी ( दि. 24) एका कार्यक्रमानिमित्त आमदार मिटकरी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, अशोक चक्राबाबत नुकताच सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेले मत समाधानकारक आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस हे सरकार लोकशाहीची पायमल्ली करून सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. ते जास्त दिवस टिकणार नाही. शिंदे-फडणवीस हे दीड दोन महिन्याचे मंत्री आहेत आणि हे त्रिकाल बाधित सत्य आहे. तसेच यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या बद्दल व्यक्त केलेल्या मताशी आपण सहमत आहोत. पुरंदरेंनी साहित्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांची जेवढी बदनामी केली तेवढी कोणीच केली नाही, असेही यावेळी मिटकरी म्हणाले.