जे पटत नाही, त्याविरोधात व्यक्त होण्यात काहीही गैर नाही; संजय राऊतांसमोरच पुण्यातील शिवसेनेचा वाद
By राजू इनामदार | Updated: January 27, 2025 17:56 IST2025-01-27T17:55:31+5:302025-01-27T17:56:21+5:30
विधानसभा निवडणुकीत सुतार यांनी प्रचाराचे काम केले नाही असा मोकाटे यांचा आक्षेप आहे, तेच शेजारी आल्यानंतर मोकाटे संतप्त झाले

जे पटत नाही, त्याविरोधात व्यक्त होण्यात काहीही गैर नाही; संजय राऊतांसमोरच पुण्यातील शिवसेनेचा वाद
पुणे: शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यासमोरच शहर शिवसेनेतील दुफळी उघड झाली. त्याकडे दुर्लक्ष करत राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना, जे गेलेत ते जाऊ द्या, आहेत त्यांनी महापालिकेची तयारी सुरू करा असा सल्ला दिला. आघाडी की स्वबळावर याचा निर्णय वरिष्ठ घेतली, त्याआधी आपण सज्ज असायला पाहिजे असे ते म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे कलादालनात सोमवारी दुपारी राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना शहर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, रविंद्र मिर्लेकर, संपर्क नेते सचिन आहेर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, श्वेता चव्हाण, संजय भोसले व अन्य पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. पृथ्वीराज सुतार सभागृहात खाली बसले होते. राऊत यांनी त्यांना वर बोलावले, ते नेमके मोकाटे यांच्या शेजारील खुर्चीवर बसले.
विधानसभा निवडणुकीत सुतार यांनी प्रचाराचे काम केले नाही असा मोकाटे यांचा आक्षेप आहे. तेच शेजारी आल्यानंतर मोकाटे संतप्त झाले. हा काय प्रकार आहे अशी विचारणा त्यांनी केली. दरम्यान सभागृहात उपनेत्या अंधारे आल्या. मोकाटे यांनी त्यांना लगेचच स्वत:ची जागा दिली व ते उठून शहरप्रमुखांच्या शेजारी उभे राहिले. तिथून ते आलो मी असे म्हणत थेट सभागृहाच्या बाहेर गेले ते परत आलेच नाहीत. मोरे त्यांना बोलावण्यासाठी गेले होते, मात्र तोपर्यंत ते निघून गेले होते.
महिनाभरापूर्वी पक्षाच्या ५ माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्याचा संदर्भ देत राऊत यांनी जे गेले ते गेले, त्यांचा विचार करू नका, त्यांच्याकडे ज्या जबाबदाऱ्या होत्या, त्यावर लगेचच नवीन लोकांना संधी द्या, एकूणच जे जुने पदाधिकारी आहेत, काम करत नाहीत, त्यांना मोकळे करा व तिथे नवीन तरूण रक्ताला संधी द्या असे त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुक स्वबळावर लढायची की महाविकास आघाडीबरोबर याचा निर्णय नेते घेतील, मात्र तोपर्यंत आपली तयारी हवी. त्यामुळे लगेचच संघटनात्मक बांधणीला लागा, प्रत्येक प्रभागात आपले शिवसैनिक हवेत, त्यांच्या बैठका सुरू करा असे त्यांनी सांगितले.
राऊत यांना भेटण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारीही आले होते. त्यांच्याबरोबरही राऊत यांनी नंतर बैठक घेतली. लहुजी वस्ताद स्मारकासाठी सरकार नियुक्त समितीवरील सदस्य निलेश वाघमारे यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे राऊत यांनी स्वागत केले. शहरातील आणखी काही राजकीय व्यक्ती लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती यावेळी मोरे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत कोणी काय काम केले याचा अहवाल पक्षाकडे आहे. तरीही असे काही होत असेल तर ते न पटणारे आहे. मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. शिवसेनेत याआधी कधीही होत नव्हते. जे पटत नाही, त्याविरोधात व्यक्त होण्यात काहीही गैर नाही. चंद्रकांत मोकाटे- माजी आमदार