मावळ : होम क्वारंटाइनचा शिक्का असताना उमरगा (जि.उस्मानाबाद ) येथून मुंबईकडे जाणाऱ्या १६ जणांना वडगाव पोलिसांनी पकडले. त्यांना वडगाव येथील भेगडे लॉन्समध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. कर्नाटक सीमेवर असलेल्या मुरूम येथून सुमारे ४०० किलोमीटरचा प्रवास नाकाबंदी असताना या लोकांनी केला. पोलिसांनी वडगाव येथे त्यांना ताब्यात घेतले.याप्रकरणी मैनुद्दीन शरमुद्दीन शेख रा.अंधेरी असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वारंटाईन केलेल्या लोकांनी आता पोलिसांकडे भलतीच मागणी केली आहे. आम्हाला खायला मांसाहार, गुटखा, सिगारेट, तंबाखू द्या .द्यायला जमत नसेल तर घरी सोडा अन्यथा आम्ही आत्महत्या करू असा सज्जड दम वडगाव येथे होम क्वारंटाइन करण्यात आलेल्यांनी दिला आहे.तसेच या लोकांनी खुर्चांची मोडतोड केली.गेल्या तीन दिवसांपासून यांना भेगडे लॉन्समध्ये पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी दोन एसी रूम असून सकाळी २२ बिस्कीट पुडे, चहा,जेवण, दुपारी पुन्हा चहा बिस्कीट, रात्री जेवण दिले जाते अशी माहिती वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दिली. तरी देखील मांसाहार, तंबाखू, सिगारेटची मागणी करतात. गुड्डेच बिस्कीट पाहिजे असा हट्ट करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील काही जणांनी येथील खुर्चांची मोडतोड करत बेसीनही फोडले. आम्हाला घरी सोडा अन्यथा आम्ही आत्महत्या करू असा दम देतात. तसेच आतील कचरा शेजारी राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या घराजवळ टाकतात. या सर्व जणांना वडगाव येथून हालवून त्यांना त्याच्या घरी पाठवावे अशी मागणी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी वडगाव पोलिसांकडे केली आहे. २४ तास ड्युटी करून पोलिसांचे अतोनात हाल झाले आहेत.त्यात यांच्या त्रासाने पोलिसही वैतागले आहेत.
...तर आम्ही आत्महत्या करु ; वडगाव मावळ येथे क्वारंटाईन केलेल्यांची पोलिसांकडे भलतीच मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 15:49 IST
४०० किलोमीटरचा प्रवास नाकाबंदी असताना या लोकांनी केला.
...तर आम्ही आत्महत्या करु ; वडगाव मावळ येथे क्वारंटाईन केलेल्यांची पोलिसांकडे भलतीच मागणी
ठळक मुद्देवडगाव येथून हालवून क्वारंटाईन लोकांना त्यांच्या घरी पाठवावे, ग्रामस्थांची मागणी