पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार, २ फेब्रुवारी) पुण्यात सुरू असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावत मराठी भाषा, मराठी माणूस आणि राज्यातील सद्यस्थितीवर परखड भूमिका मांडली. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आग्रह केल्याने आपण या कार्यक्रमाला आलो असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण पूर्ण सहकार्य करू, मात्र त्याचवेळी आम्ही काही गोष्टी करणार असू, तर तेव्हा आमच्यावर केसेस टाकू नका, असा मिश्कील टोला त्यांनी मंत्री उदय सामंत यांना लगावला.मराठी अस्तित्वाचा सवालमराठी भाषेचे आणि मराठी माणसाचे भवितव्य धोक्यात असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर निशाणा साधला. “हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय नागरिक असूनही कोणीही जमीन विकत घेऊ शकत नाही. पण महाराष्ट्रात मात्र ‘या आणि आमची जमीन घेऊन जा’ असे चालते” “आमचीच माणसं आमच्या राज्यात बेघर होत असतील, तर त्याला विकास म्हणता येणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी मुंबई आणिमहानगरांतील मराठी लोकांचे घटते प्रमाण हा चिंतेचा विषय असल्याचे म्हंटले.मराठी भाषेचा अभिमान हवा“आपल्या मुलांना मराठीत बोलायला शिकवा. मराठीत विचार करायला लावा. आजकाल आपली मुलं एकमेकांशी हिंदीत बोलतात, हे दुर्दैव आहे,” असे सांगत त्यांनी पालकांनी आपल्या घरातच मराठीचा आग्रह धरला पाहिजे, असे मत मांडले.“जय जय महाराष्ट्र माझा!” म्हणत आपण राज्याचा अभिमान बाळगतो, पण अन्य कोणत्याही राज्यात असे गीत नाही. मग आपल्यालाच आपल्या भाषेचा अभिमान नसेल, तर इतर आपल्याला काय किंमत देणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.साहित्य संमेलन आणि वाचनसंस्कृती“नुसती पुस्तके वाचली जाणार नाहीत, कारण आता लोक वाचत नाहीत. जे काही येते ते फक्त व्हॉट्सअॅपवर!” असे सांगत त्यांनी तरुण पिढीला वाचनसंस्कृती जपण्याचे आवाहन केले. “संमेलनातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येकाने किमान १० पुस्तकं विकत घेतली पाहिजेत,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.जातीपातीच्या राजकारणावर प्रहारआपल्या महापुरुषांना जातीपातीच्या चौकटीत अडकवू नका. छत्रपती शिवाजी महाराज असोत की छत्रपती संभाजी महाराज, ते सर्वांचे आहेत. महाराष्ट्राने जातीपातीच्या संकुचित मानसिकतेतून बाहेर यायला हवं, असे आवाहन करत त्यांनी समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवले.रितेश देशमुख लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून, संभाजी महाराजांवरही नवीन चित्रपट येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.मराठीच्या लढ्यासाठी मनसेची भूमिकाराज ठाकरे यांनी मनसेच्या आंदोलनशैली आणि मराठी अस्मितेसाठी पक्षाने लढलेल्या लढ्यांवरही भाष्य केले. “जेव्हा आम्ही काही करतो, तेव्हा त्यावर केसेस टाकल्या जातात. पण मराठीसाठी जे आवश्यक आहे ते आम्ही करत राहू,” असे सांगत त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला.