पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नव्याने प्रारुप प्रभाग रचनेचे काम सुरू झाले असून येत्या २३ किंवा २४ जुलैला हे काम पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत.पुणे महापालिकेमध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार शहरात १६५ नगरसेवक असतील. नगरविकास विभागाने प्रभाग रचनेसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार सध्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंगचा वापर करून प्रारुप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.येत्या २३ ते २४ जुलैपर्यंत हे काम पुर्ण करण्यात येईल. यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रभागांच्या सीमारेषांची पाहाणी करण्यात येईल. यानंतर हे प्रारूप महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येईल. महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम झालेले प्रारुप चार ऑगस्टपर्यंत नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेचे काम २४ जुलैपर्यंत पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 19:57 IST