पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य मंत्रिमंडळाची तत्त्वत: मान्यता मिळाली असून, या निर्णयामुळे सूस व म्हाळुंगेसह पुणे शहराच्या पश्चिम भागाला दिलासा मिळणार आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरासह सूस व म्हाळुंगे या भागात झपाट्याने वाढणाऱ्या नागरी वस्तीमुळे पिण्याच्या पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत असून, भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक होती. याच पार्श्वभूमीवर, यापूर्वी पुणे शहराच्या उत्तर भागासाठी भामा-आसखेड धरणाचे पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या योजनेच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी अजित पवार यांच्या उपस्थितीत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे आणि माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी मुळशी धरणातून सूस म्हाळुंगेसह पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करण्याची मागणी लेखी स्वरूपात मांडली होती.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत, यासाठी लवकरच समिती नेमून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे जाहीर केले होते. अखेर, राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांबाबत पाणीपुरवठा, सांडपाणी, रस्ते व घनकचरा व्यवस्थापनाचे सर्व अधिकार पुणे पालिकेकडे देण्याचा निर्णयही पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे शासनस्तरावर घेण्यात आला आहे.