पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परभणीतील स्थिती अतिशय गंभीर आहे. मी त्याठिकाणी जाऊन देशमुख कुटुंबीयांना भेटून आलो. तेथील परिस्थितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून स्थिती अतिशय गंभीर असून, काळजीपूर्वक नोंद घेतली पाहिजे, असे सांगितले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
रविवारी (दि. २२) पुण्यातील सिंचननगर परिसरातील भीमथडी जत्रेला पवार यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी सुनंदा पवार उपस्थित होत्या. भीमथडीबद्दल बोलताना, ग्रामीण वारशाचे जतन तसेच नावीन्यपूर्णतेचे प्रदर्शन करण्यासाठी समर्पित असलेल्या भीमथडी जत्रेने ग्रामीण-शहरी दरी कमी करण्याबरोबरच ग्रामीण समुदायांना विशेषतः महिला उद्योजकांना सक्षम करण्याचे काम केले आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
दरम्यान, रविवारी भीमथडी यात्रेतूनच पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. यंदाचे साहित्य संमेलन दिल्लीला असून, त्याच्या उद्घाटनाला आपण उपस्थित राहावे, अशी सर्व साहित्यिकांची अपेक्षा आहे, असे सांगितले. २१ फेब्रुवारीला तीन दिवसीय साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारले असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.