पुणे : सार्वजनिक बांधकाम विभाग, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि महापालिका या प्रशासनाच्या विविध विभागांकडून दुरुस्तीच्या जबाबदारीची ढकला ढकली केली जात असल्याने फातिमानगर ते धोबी घाट चौक या दरम्यानचा रस्ता बेवारस झाला आहे. या रस्त्यावर सोलापूर बाजार ते गोळीबार मैदान यादरम्यान एक फुट खोलीचे मोठे-मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
फातिमानगर ते धोबी घाट चौक या दरम्यानचा रस्ता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येतो. हा रस्ता पूर्वीपासून राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होता. त्यामुळे या रस्त्याची देखभाल, दुरुस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. त्यामुळे महापालिका या रस्त्याची दुरुस्ती करत नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून मात्र या रस्त्याची दुरुस्ती केली जात होती. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विलीनीकरण महापालिकेत करण्यात येणार आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या परिसरातील अनेक कामे रखडलेली आहेत.
दरम्यान, फातिमानगर ते धोबी घाट या दरम्यानचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महापालिकेकडे वर्ग करण्याचा शासन आदेश २०१७ ला काढला. त्यानंतर महापालिकेने हा रस्ता हस्तांतरित करण्यासाठी २५ एप्रिल रोजी महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यावर बांधकाम विभागाने १९ मे रोजी पुन्हा महापालिकेला पत्र पाठवून हा रस्ता २०१७ च्या आदेशानुसार आपल्याकडेच दिल्याचे कळविले.
त्यानंतरही महापालिकेने अद्याप या रस्त्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. परिणामी, या रस्त्यावर सोलापूर बाझार ते गोळीबार यादरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहने खड्ड्यांमध्ये आदळत आहेत. खड्ड्यांमध्ये गाडी आदळल्यानंतर अचानक वेग कमी होतो, त्यामुळे एकमेकांवर वाहने आदळण्याचेही प्रमाण वाढले आहे. शिवाय, संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांतील खडी व मातीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे हा रस्ता पुणे शहरातील आहे का ग्रामीण भागातील, असा प्रश्न पडतो. प्रशासनाने जबाबदारीची ढकला ढकली न करता रस्ता खड्डेमुक्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.