नदी सुधारची वल्गना; पण शेजारीच पवना फेसाळली..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 09:28 IST2024-12-18T09:28:25+5:302024-12-18T09:28:59+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्ताच नाही : महापालिका पर्यावरण विभाग घेतोय शोध

नदी सुधारची वल्गना; पण शेजारीच पवना फेसाळली..!
विश्वास मोरे
पिंपरी : पवना नदीतीरावर चिंचवड येथे महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी सायंकाळी सुरू होता. व्यासपीठावर नदी सुधार योजनेची वल्गना होत असतानाच काही अंतरावर असलेली पवना नदी फेसाळली होती, दुर्गंधी येत होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाला नदी फेसाळल्याचा पत्ताच नसल्याचे दिसून आले; तर नदी कशामुळे फेसाळली, याचा महापालिका पर्यावरण विभाग शोध घेत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून पवना नदी वाहते. किवळे-रावेतपासून दापोडीपर्यंत २४.२ किलोमीटरचे पात्र आहे. गेल्या दोन वर्षांत नदी फेसाळण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेकडून कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही.
चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्यास सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. त्यावेळी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी तीर्थक्षेत्र विकासावर भाष्य केले. देहू, आळंदी आणि शहरातील तीर्थस्थळांचा कॉरिडॉर करता येईल, अशी संकल्पना मांडली. पवना नदी प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार झाला. त्यामुळे नदीप्रदूषण कमी होईल, याची माहिती दिली. महोत्सवात नदी सुधारची वल्गना होत होती, त्याच वेळी कार्यक्रमस्थळापासून तीनशे मीटरवर पवना नदी फेसाळली होती.
नदी फेसाळण्याचे कारण सापडेना
थेरगाव बोट क्लब येथील केजूदेवी बंधाऱ्यापासून चिंचवड पुलापर्यंतच्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर फेस दिसून आला. नदी वर्षात चार वेळा फेसाळली आहे. ती कशामुळे फेसाळत आहे, याचे कारण गेल्या दोन वर्षांमध्ये महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला सापडलेले नाही. मंगळवारी बोट क्लबपासून चिंचवडपर्यंत नदीपात्र फेसाने आच्छादल्याचे दिसून आले. याबाबत प्रदूषण असेल तर माहिती घेऊ, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पवना नदीला फेस आला आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर महापालिकेतील पर्यावरण विभागाचे पथक पाहणीसाठी पाठवले आहे. कशामुळे नदीला फेस आला याचा शोध घेतला जाईल व त्यावर उपाययोजना केली जाईल. - संजय कुलकर्णी, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता