जनतेचे रक्षकच बनलेत भक्षक..! प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लाचखोरीत पोलिस अव्वल
By विश्वास मोरे | Updated: November 4, 2025 15:04 IST2025-11-04T15:03:45+5:302025-11-04T15:04:06+5:30
- वर्षभरात २३ पैकी ९ जण खाकी वर्दीतील, ६ महापालिकेतील आणि ८ जिल्हा प्रशासनातील सापळ्यात

जनतेचे रक्षकच बनलेत भक्षक..! प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लाचखोरीत पोलिस अव्वल
पिंपरी : "सद्रक्षणाय खलनिग्रणाय" यासाठी असे ब्रीद असणाऱ्या पोलिस खात्यातील खाबुगिरी आणि लाचखोरी वाढली आहे. वर्षभरामध्ये पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील एकूण लाचखोरीच्या २३ घटनांपैकी ०९ पोलिसांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. महापालिका आणि विविध शासकीय कार्यालयातील विविध कामासाठी तसेच विविध गुन्ह्यामध्ये आरोपीला मदत करणे, अटक न करणे, प्रकरण मिटविणे अशा विविध कारणांसाठी १६०० रुपयांपासून तर दोन कोटीपर्यंतची लाच मागण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे जनतेचे रक्षकच भक्षक झाले असल्याचे दिसून येत आहे.
गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलिस आयुक्तालयातंर्गत असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला दोन कोटी पैकी ४५ लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयातील आणि पोलिस खात्यातील लाचखोरीचा विषय ऐरणीवर आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शहर तसेच मावळ चाकण परिसराचा समावेश होतो. एकूण २२ पोलिस ठाण्यांचा परिसर आहे. गेल्या वर्षभरामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे जिल्ह्यामध्ये लाचखोरीच्या ५७ गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरामध्ये २३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये तहसीलदार, महावितरण, उपनिबंधक, भूमी अभिलेख या विविध जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत असणारी विविध कार्यालय तसेच पिंपरी- चिंचवड महापालिका आणि पोलिस आयुक्तालय यामधील गुन्हे अधिक असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरामध्ये पोलिस खात्यातील नऊ, महापालिका कार्यालयांमधील ६ आणि जिल्हा प्रशासनाच्या संदर्भातील ८ अशा एकूण २३ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने रंगेहात पकडले आहे. लाच स्वीकारण्याच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जनतेचे रक्षकच भक्षक झाले असल्याची टीका होत आहे. 
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लाचखोरीत पोलिस अव्वल
...
दि. ४. ९. २०२४ : फौजदारी गुन्ह्यात मदत करण्यासाठी वडगाव मावळ पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक तुळशीराम मगर, अंमलदार सागर गाडेकर यांनी पन्नास हजारांची लाच मागितली होती. त्यापैकी ३५ हजारांची लाच स्वीकारताना पडकले होते.
..
दि. ११. १०. २०२४ : अपघाताचे प्रकरण मिटवण्यासाठी रावेत पोलिस ठाण्यातील हवालदार ज्ञानदेव तुकाराम बगाडे यांना पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
...
दि. १४. १०. २०२४: तळेगाव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या बियर शॉपी चालू ठेवण्यासाठी पोलिस हवालदार सतीश अरुण जाधव (वय ४२) यांना पाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
...
दि. १४. ४. २०२५ : एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी पिंपरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक नीलेश रमेश बोकेफाडे यांनी ४० हजारांची लाच मागितली. त्यापैकी ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
..
दि. १५. ४. २०२५ : एका प्रकरणामध्ये पतीला जामीन मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी हिंजवडी पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक दत्तात्रय नामदेव काळे (वय ३०) याने साठ हजारांची लाच मागितली होती. त्यापैकी ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
...
दि. १५. ४. २०२५ : गुन्हेगाराला मदत करण्यासाठी वडगाव मावळ येथील निरीक्षक तुळशीराम मगर, सहायक निरीक्षक सागर गाडेकर यांना ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
..
दि. १८. ७. २०२५ : आरोपीला अटक न करण्यासाठी रावेत पोलिस ठाण्यातील पोलिस हवलदार राजश्री रवी घोडे आणि राकेश शांताराम पलांडे यांनी पन्नास हजारांची लाच मागितली होती. त्यापैकी ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
....
दि. २९. ९. २०२५ : गुन्ह्यात मदत करण्यासाठी लोणावळा पोलिस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक शकील मोहम्मद शेख यांनी गुन्ह्यात मदत करण्यासाठी वीस हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते.
...
दि. २. ११. २०२५ : गुन्हा मदतीसाठी व त्याच्या अटकेत असलेल्या वडिलांच्या जामीन अर्जाबाबत साहाय्य करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी (वय ३५) याला ४६ लाखांची लाच घेताना पकडले आहे.