पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, ताेंडी परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी आदी परीक्षेचे गुण ओएमआर गुणपत्रिकेऐवजी आता थेट मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन माध्यमातून भरावे लागणार आहेत. या संदर्भात राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
फेब्रुवारी / मार्च २०२४ मध्ये हाेणाऱ्या एसएससी, एचएससी परीक्षांसाठी ऑनलाईन माध्यमातून गुण भरण्याची कार्यपद्धती लागू करण्यात येणार आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालयांतील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण राज्य शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील इंटर्नल / प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड' या लिंक मधून प्रचलित लॉगिन आयडी व पासवर्डचा वापर करून परीक्षांचे गुण मंडळाकडे पाठवावे लागणार आहेत.
संकेतस्थळावर गुण नाेंदविण्याकरिता मेकर-चेकर कार्यपध्दती वापर केला जाईल. प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना चेकर म्हणून काम करावे लागणार आहे. मुख्य लाॅगीन आयडीवरून सर्वप्रथम शाळा, महाविद्यालयाचा अधिकृत ईमेल व जबाबदार प्रतिनिधीचा माेबाईल क्रमांकाची नाेंद करावयाची आहे. मुख्य लाॅगीन आयडीमधून किमान एक किंवा त्यापेक्षा जास्त मेकर युझर म्हणजे गुण नाेंदणी करणारा व्यक्ती तयार करणे आवश्यक आहे. मेकर लाॅगीनमध्ये विषय आणि माध्यम निहाय त्या त्या विषयाची काेरी पृष्ठे प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान गुणांकन करण्यासाठी उपलब्ध हाेतील. विषयनिहास प्रात्यक्षिक/ अंतर्गत मुल्यमापन झाल्यानंतर संबंधित विषयाच्या काेऱ्या गुणपत्रिकांवर बैठक क्रमांकानुसार गुण/ श्रेणीची नाेंद घेउन मेकर लागीनमधून एचएससी मार्क / ग्रेड या पर्यायांमधून ऑनलाईन एन्ट्री करायची आहे. विषयनिहाय सर्व गुणांची नाेंद झाल्यानंतर ते तपासणीसाठी चेकरकडे पाठविता येतील. चेकर म्हणजेच मुख्याध्यापक, प्राचार्यांनी ते तपासून मान्य केल्यानंतर अंतिम गुण व श्रेणी मंडळाला पाठविता येणार आहेत. यासाेबतच विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक, ऑनलाईन नाेंदविलेल्या गुणांची प्रिंट घेउन त्यावर अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी तसेच मुख्याध्यापक, शाळेचा शिक्का, स्वाक्षरी करून ते गुणतक्ते सीलबंद पाकिटात मंडळाकडे जमा करायचे आहेत.