पुणे: पुणे महापालिकेची आगामी निवडणूक ताेंडावर असताना पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी परिसर पुणे महापालिकेत समावेश करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. या दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेशाची अधिसूचना निघत नाही तोपर्यंत सध्याच्या भौगोलिक स्थितीनुसार प्रभाग रचनेचे काम सुरू राहणार आहे. पुणे कॅन्टोन्मेंटची २०११ नुसार ७१ हजार ७८१, तर खडकी कॅन्टोन्मेंटची लोकसंख्या ७०,३९९ आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या दोनने, तर एक प्रभाग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दोन्ही बोर्डाचा समावेश झाल्यानंतर पुण्यात प्रभाग संख्या ४३ राहणार असून, नगरसेवकांची संख्या १६७ राहणार आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने नव्याने प्रारूप प्रभाग रचनेचे काम सुरू झाले असून येत्या २३ किंवा २४ जुलैला हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रभागांच्या सीमारेषांची पाहणी करण्यात येईल. यानंतर हे प्रारूप महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात येईल. महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने अंतिम झालेले प्रारूप चार ऑगस्टपर्यंत नगरविकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे, पण त्यातच पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी परिसर पुणे महापालिकेत समावेश करण्यास राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रभार रचनेचे काम लांबणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समावेशाची अधिसूचना निघत नाही तोपर्यंत सध्याच्या भौगोलिक स्थितीनुसार प्रभाग रचनेचे काम सुरू राहणार आहे.
...तरच निवडणूक लांबणीवर पडू शकते
पुणे महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना अंतिम होईपर्यंत पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समावेशाची अधिसूचना निघाल्यास प्रभाग रचनेत बदल होऊन निवडणुका लांबणीवर पडू शकतात. प्रभाग रचना अंतिम होऊन प्रसिद्ध झाल्यानंतर या दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या समावेशाची अधिसूचना निघाल्यास पालिकेत २०११ गावे समावेश झाल्यानंतर त्या भागासाठी स्वतंत्र निवडणूक घेण्यात आली होती. त्याप्रमाणे या दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी तयार होणाऱ्या प्रभागाची स्वतंत्र निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.