बारामती : बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथे निरा डावा कालव्याला भगदाड पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि याच दबावामुळे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती समोर येत आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग झालाय काही काळासाठी बंद करण्यात आला आहे.
यामुळे कालव्याचे पाणी थेट नागरिकांच्या घरात आणि शेतात शिरले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी जलसंपदा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कालव्याला भगदाड; सर्वत्र पाणीच पाणी…
निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू असतानाच गेल्या काही तासांपासून बारामती तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे कालव्यातील पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला. पिंपळी लिमटेक परिसरात कालव्याच्या काठाला भगदाड पडल्याने पाणी बाहेर पडले आणि आसपासच्या शेतजमिनी आणि घरांमध्ये शिरले. यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.कालव्याचे पाणी वेगाने आले, काही कळायच्या आतच शेतात आणि घरात पाणी शिरले. यात बरेच नुकसान झाले आहे. अशी माहिती स्थानिकांनी दिली. lनागरिकांना प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
जलसंपदा विभागाची कारवाई
पिंपळी लिमटेक येथे कालव्याला भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदा विभागाने तात्काळ कारवाईला सुरुवात केली. कालव्यातील पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी निरा डावा कालवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, भगदाड दुरुस्त करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
या संकटाच्या पार्श्वभूमीवर बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
“सध्या तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. नदीपात्र आणि कालव्या परिसरात नागरिकांनी जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा,” असे शिंदे यांनी नमूद केले. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याचेही त्यांनी सुचवले आहे.
नागरिकांचे नुकसान; मदतीची गरज
कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर अनेक कुटुंबांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून तातडीने मदत आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.