श्रीकिशन काळे
पुणे : अतिशय तुच्छ समजली जाणारी बुरशी ही खरंतर निसर्गासाठी उपयुक्त असते. परंतु, तिच्याविषयी जनजागृती नसल्यामुळे ती दुर्लक्षित राहिली आहे. या बुरशीविषयी लोकांमध्ये योग्य माहिती पोहोचावी म्हणून खास निसर्गसूत्र अभियानातंर्गत बुरशीवर पुस्तिका तयार केली आहे. त्यामध्ये बुरशीचे नाव, ती खाता येते का ? ती औषधी गुणधर्मयुक्त आहे का ? अशी माहिती असणार आहे. वनांमध्ये जो बहर येतो, त्यासाठी बुरशी कारणीभूत असते. समृद्ध वनांसाठी बुरशी आवश्यक आहे.
बुरशीचे बीजाणू छत्र्यांमधून बाहेर पडतात. काही प्रजातीच्या बुरशीचा भाग आपण खातो. पण बुरशी अनेक प्रकारची असते. भिंतींवर पडलेले काळे डाग, पानांवरचा पांढरा थर, सडलेल्या फळावरचा हिरवट पापुद्रा आणि सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे अनेक जीवाणू हे बुरशीचेच असतात. पृष्ठभागाच्या खाली बुरशी जाळी सारखी पसरलेली असते. त्याचे पातळ धागे सूक्ष्म असतात. वरती विविध बुरशी दिसतात. पण यातील अनेक जमिनीखाली एकमेकांशी जोडलेल्या असतात.
बायोस्फिअर्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी निसर्गसूत्र हे अभियान हाती घेतले आहे. त्यांना या अभियानात सहायक म्हणून निवेदिता जोशी व शैलेश सराफ काम करत आहेत. निसर्गसूत्र अंतर्गत सह्याद्रीमधील ताम्हिणी घाटातील बुरशांवर पुस्तिका केली आहे. त्यामध्ये ६४ बुरशींचे चित्र, नावे आहेत. त्यानंतर रायरेश्वर, महाबळेश्वर, भीमाशंकर या ठिकाणची जैवविविधता समोर आणण्यात येईल.
डॉ. पुणेकर म्हणाले, निसर्गसूत्र या अभियानाची सुरुवात उद्या जागतिक वन दिनानिमित्त करत आहोत. पहिले ताम्हिणी भाग घेतला आहे. त्यानंतर दख्खन पठार व इतर भाग घेऊ. ताम्हिणीवर आम्ही गेली १७ महिने काम केले. त्यानंतर तेथील संस्कृती, आदिवासी लोकं, देवराई, वनस्पती, पक्षी आदींची माहिती संकलित केली. त्याची माहिती निसर्ग सूत्र या संकेतस्थळावर उद्यापासून उपलब्ध असेल.
बुरशा या वनांना रिसायकल, वनस्पतींचे पुनर्निर्माण, लाकडाचे विघटन, मातीला समृध्द करतात. मातीमधील जीवसृष्टीला अन्न द्रव्य पुरवतात. वन म्हणजे केवळ झाडं नव्हेत. त्यात सर्व जैविक घटक येतात. त्यांचे महत्त्व खूप आहे. बुरशीमुळे वने समृध्द होतात. बुरशा सुक्ष्म असल्या तरी त्यांचे काम मोठे आहे. काही बुरशा पानांवर, पालापाचोळा, खोडावर, पाण्यात, मातीत, झाडांवर जगतात. एडोफायटी फंजा या बुरशा तर वनस्पतीच्या पेशींमध्ये राहतात. दगडफुलमध्ये बुरशी असते. मशरूम ही खाद्य बुरशी आहे. आदिवासी उपजिविका बुरशांवर होते. वारूळावर टरमॅटोमायसिस या बुरशा येतात.
जनजागृती करण्यासाठी पुस्तिका तयार
निसर्गात दडलेली सूत्र आणि दृष्टी आडची सृष्टी आम्ही समोर आणत आहोत. हरित दृष्टी देण्याचे कामया निसर्गसूत्रद्वारे होईल. समृद्ध वनांसाठी बुरशी आवश्यक आहे. बुरशी बाबत माहिती नसते. जनजागृती करण्यासाठी पुस्तिका तयार केली आहे. - डॉ. सचिन पुणेकर, संस्थापक, बायोस्फिअर्स