पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात उन्हाचे तीव्र चटके बसत असून, अंगाची लाही लाही करणाऱ्या असह्य उकाड्याने पुणेकर बेजार झाले आहेत. आजवरचा इतिहास बघता ‘एप्रिल’ महिना हा पुणेकरांसाठी कायमच ‘ताप’दायक ठरला आहे. गेल्या दहा वर्षांत पुण्यात एप्रिल महिन्यातील कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या घरातच राहिला असून, अपवाद केवळ २०२१ चा ठरला आहे. २०१९ मध्ये ४३ अंश सेल्सिअस इतकी आजवरच्या पुण्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच लोहगाव येथे ४३.२ तर पुण्याचे तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
एकेकाळी थंड हवेचे ठिकाण अशी पुण्याची ख्याती होती. निवृत्त अधिकारी-कर्मचारी यांची पहिली पसंती पुणेच असायची. पण पुण्याचे झपाट्याने शहरीकरण झाले आणि पुण्याचे तापमानच बदलले. काॅंक्रिटच्या जंगलाने वेढलेल्या शहरात सूर्य आग ओकायला लागला आहे. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे नागरिकही दुपारी घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. यातच घरातही वातानुकूलित यंत्रणा व फॅनमधून गरम वारे बाहेर पडत असल्यामुळे घरातही पुणेकरांचे बसणे अशक्य झाले आहे. गेल्या दहा वर्षांच्या पुण्यातील कमाल तापमानाच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता तापमानाचा पारा केवळ २०२१ च्या ३९.६ अंश सेल्सिअसचा अपवाद वगळला तर चढाच राहिला आहे. २०१५, २०१६, २०१७, २०१८, २०२०, २०२३ मध्ये कमाल तापमान ४० अंशापर्यंत होते. तर २०२२ आणि २०२४ मध्ये ४१.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते. यंदाचा एप्रिल महिना देखील पुणेकरांसाठी ‘उष्ण’ ठरला आहे. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात कमाल ४१.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. शहरात ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने तापमानाच्या पाऱ्यात काहीशी घट होत असली तरी पुन्हा एक ते दोन दोन अंशाने तापमान वाढत असल्याचा अनुभव पुणेकर घेत आहेत. पुढच्या दोन दिवसांत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून, तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत स्थिर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
वर्ष कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
२७ एप्रिल २०१५ -------------- ४०
२७ एप्रिल २०१६ ------- ----- --४०. ९
१८ एप्रिल २०१७ ----------------४०.८
२८ एप्रिल २०१८ -----------------४०. ४
२८ एप्रिल २०१९ -----------------४३
१६ एप्रिल २०२० -----------------४०.१
५ एप्रिल २०२१ -------------------३९.६
२८ एप्रिल २०२२ -----------------४१.८
१९ एप्रिल २०२३ -----------------४०
२९ एप्रिल २०२४-----------------४१.८