मालक तरुणीला म्हणाला, “घरी ये; मग, सॅलरी देतो!” विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा
By नितीश गोवंडे | Updated: December 30, 2023 18:25 IST2023-12-30T18:21:16+5:302023-12-30T18:25:02+5:30
या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

मालक तरुणीला म्हणाला, “घरी ये; मग, सॅलरी देतो!” विनयभंगप्रकरणी दोघांवर गुन्हा
पुणे : शहरात दिवसेंदिवस महिलांविषयी छेडछाड, विनयभंग आणि बलात्कार यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. एका कंपनीच्या मालकाने युवती सॅलरी मागण्यासाठी गेली असता, “एकटी घरी ये; मग, सॅलरी देतो!” असे म्हणत तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय युवती ही कोंढव्यातील हॅम्स प्रो इंटेरीअर, क्लोअर हिल्स प्लाझा येथे कामाला आहे. जून २०२३ पासून कंपनीचे मालक असिफ खान आणि सलमान खान या युवतीला वारंवार केबिनमध्ये बोलावून तिचा हात पकडायचे. हा प्रकार २ डिसेंबरपर्यंत सुरू होता. २२ वर्षीय युवतीने जेव्हा मालकांकडे पगार देण्याची मागणी केली, त्यावेळी त्यांनी “एकटी घरी ये; मग, सॅलरी देतो!” असे म्हणून तिचा विनयभंग केल्याचे युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी या प्रकरणी असिफ खान आणि सलमान खान या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मचाले करीत आहेत.