दिल्लीमधील मराठी साहित्य संमेलन अभूतपूर्व ठरेल; माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

By श्रीकिशन काळे | Updated: December 19, 2024 15:03 IST2024-12-19T15:00:35+5:302024-12-19T15:03:01+5:30

दिल्लीत सुमारे ७० वर्षांनंतर होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देऊन हे संमेलन अभूतपूर्व ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

The Marathi Literature Conference in Delhi will be unprecedented | दिल्लीमधील मराठी साहित्य संमेलन अभूतपूर्व ठरेल; माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

दिल्लीमधील मराठी साहित्य संमेलन अभूतपूर्व ठरेल; माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे : सरहद, पुणे आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या https://abmssdelhi.org या संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गुरूवारी (दि. 19) करण्यात आले. दिल्लीत सुमारे ७० वर्षांनंतर होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देऊन हे संमेलन अभूतपूर्व ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिभाताई पाटील यांच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘रायगड’ या निवासस्थानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सतिश देसाई, ॲड. प्रताप परदेशी, शैलेश वाडेकर, अनुज नहार, संतोष देशपांडे, पाटील यांच्या कन्या ज्योती राठोड आदी उपस्थित होते.

दिल्लीत होत असलेल्या संमेलनाविषयी माहिती देताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ७० वर्षांपूर्वी दिल्लीत मराठी संमेलन झाले. त्याचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले होते, तर स्वागताध्यक्ष बॅरिस्टर काकासाहेब गाडगीळ होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील संमेलन झाले होते. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा योग परत जुळून आला असून या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वीकारले आहे. ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली 98वे संमेलन होत आहे.

प्रतिभाताई पाटील यांच्या 90व्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा. मिलिंद जोशी यांनी मसापने प्रकाशित केलेला अक्षरधन हा ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान केला. तर सरहदच्या वतीने काश्मीरी गब्बा देऊन शैलेश वाडेकर आणि अनुज नहार यांनी त्यांचा सन्मान केला.
 
संकेतस्थळाची वैशिष्ट्ये
संकेतस्थळाची निर्मिती करताना त्याची रचना साधी-सोपी आणि आकर्षक करण्यात आली आहे. संमेलनाविषयी अद्ययावत माहिती, प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथ दालनाची नोंदणी या संकेतस्थळाद्वारे करता येणार आहे. तसेच मराठी भाषा, महाराष्ट्र आणि दिल्लीचे संबंध यावर प्रकाशझोत टाकणारी छायाचित्रे, व्हिडिओ क्लिप्स, पॉडकास्ट, न्यूज क्लिप्स पाहण्याची सोय आहे.

Web Title: The Marathi Literature Conference in Delhi will be unprecedented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.